King Movie : दीपिका की करीना? ‘किंग’मध्ये या दोन अभिनेत्रींच्याच नावाची चर्चा; संधी कोणाला मिळणार…

बॅालीवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खानच्या आगामी ‘किंग’ या चित्रपटाची चर्चा जोरात सुरू आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. डंकीनंतर शाहरुखचा एकही चित्रपट रिलीज करण्यात आलेला नाही. दरम्यान, त्याच्या ‘किंग’ या चित्रपटाशी निगडित चित्रपटातील कोणती अभिनेत्री किंग खानबरोबर स्क्रीन शेअर करणार याविषयी माहिती मिळत आहे.
पिंकविलाच्या वृत्तानुसार, अभिनेत्री दीपिका पदुकोण किंवा करीना कपूर या दोघींपैकी एक अभिनेत्री या चित्रपटात दिसू शकते. असे वृत्त देण्यात आले आहे. मात्र, अद्यापपर्यंत याविषयी अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. दीपिका आणि करीना या दोघींनीही याआधी शाहरुखसोबत काम केले आहे. दीपिकाने 2007 मध्ये ‘ओम शांती ओम’मधून हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता. यानंतर दोघेही ‘चेन्नई एक्सप्रेस’, ‘हॅपी न्यू इयर’, ‘पठाण’ आणि ‘जवान’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये एकत्र दिसले होते.
त्याचबरोबर करिनाने शाहरुखसोबत ‘कभी खुशी कभी गम’, अशोका, ‘डॉन’ आणि ‘रा.वन’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या जोडीला प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळाली. ‘किंग’मध्ये शाहरुखसोबत त्याची मुलगी सुहाना खानही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘मुंज्या’ फेम अभिनेाता अभय वर्माही या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.
नुकतेच लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘किंग’बद्दल बोलताना शाहरुखने तो या चित्रपटात काम करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचवेळी अबुधाबीमध्ये एका कार्यक्रमादरम्यान शाहरुखने या चित्रपटाबाबत आणखी काही अपडेट्स दिले होते. तो म्हणाला होता, “मी काही महिने चित्रपटाचे शूटिंग करणार आहे. माझा दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद खूप कडक आहे. त्याने ‘पठाण’ही बनवला होता. त्याने मला काहीही सांगण्यास नकार दिला आहे. मी जास्त काही सांगू शकत नाही, पण मी वचन देतो की, चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला खूप आनंद मिळेल.”





