Kidney Trafficking : कर्जफेडीसाठी शेतकरी किडनी विकल्याचे तीव्र पडसाद; आरोपींवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करण्याची मागणी
Kidney Trafficking : किडनी विक्री रॅकेटमध्ये गुंतलेल्यांना मोक्का लावण्यासाठी कायद्यातील तरतुदी तपासून घेण्यात येतील, अशी माहिती पंकज भोयर यांनी दिली.

Kidney Trafficking : चंद्रपूरमधील शेतकऱ्याला कर्ज फेडण्यासाठी चक्क आपली किडनी विकावी लागली असल्याची घटना समोर आल्यानंतर विधानसभेत देखील याचे पडसाद उमटले. चंद्रपूरमधील शेतकऱ्याला एक लाखासाठी ७४ लाख रुपये द्यावे लागले. किडनीही विकून पैसे दिले, शेती गेली, ट्रॅक्टर उचलून नेला. हे सर्व प्रकरण पाहाता महाराष्ट्रात सावकारांचे राज्य असल्यासारखी परिस्थिती आहे. हे रॅकेट मोडून काढले पाहिजे, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
त्यावर गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी, या प्रकरणी कारवाईसाठी एसआयटी गठित केली असल्याचे सांगितले. याशिवाय या किडनी विक्री रॅकेटमध्ये गुंतलेल्यांना मोक्का लावण्यासाठी कायद्यातील तरतुदी तपासून घेण्यात येतील, अशी माहिती पंकज भोयर यांनी दिली.
चंद्रपूर जिह्यातील नागभिड तालुक्यातील मिंथूर येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याला खासगी सावकारांनी कर्जाच्या विळख्यात ओढून कंबोडियात जाऊन किडनी विकण्यास भाग पाडल्याची घटना मागील डिसेंबरमध्ये घडल्याच्या घटनेकडे आमदार अतुल भातखळकर यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे सभागृहाचे लक्ष वेधले.
यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना भोयर म्हणाले, २०२१ ते २०२३ या कालावधीत ही घटना घडली असून २०२५ मध्ये संबंधित शेतकऱ्याने पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर प्रकरण उजेडात आले. चंद्रपूर जिल्ह्यातील घटनेच्या चौकशीत या प्रकरणातील मध्यस्थाच्या माध्यमातून नऊ जणांच्या किडन्या विकण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.
‘आरोपांना फाशीच दिली पाहिजे’ Kidney Trafficking
यावेळी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, 19 जणांच्या किडन्या विकल्या गेल्या आहेत. किडन्या विकण्याच्या रॅकेटमधील आरोपांना फाशीच दिली पाहिजे. याचे धागेदोरे दिल्लीपर्यंत पोहोचले आहेत. पद्मश्री मिळालेला डॉक्टर यामध्ये गुंतला असल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणातील दिल्लीच्या डॉक्टरला कोणी हात लावू शकत नाही, कारण त्याला पद्मश्री पुरस्काराने गौरवले आहे. या प्रकरणाचे कनेक्शन चंद्रपूर, सोलापूर, अहिल्यानगर पर्यंत आहे. हे रॅकेट मोडून काढले पाहिजे, असे वडेट्टीवार यांनी म्हटले.
पुढे या चर्चेला उत्तर देताना राज्य मंत्री पंकज भोयर म्हणाले की, यामध्ये कोणीही अगदी पद्मश्री मिळालेला डॉक्टर असेल तर त्याच्यावरही कारवाई केली जाईल, असे आश्वासन पंकज भोयर यांनी दिले.





