Khopoli Police : खोपोली पोलीस स्टेशनचा कारभार महिलांच्या हाती; जागतिक महिला दिनी अनोखा सन्मान
Khopoli Police : जागतिक महिला दिनानिमित्त खोपोली पोलीस ठाण्याचे प्रभारी पद PSI पूजा चव्हाण यांच्याकडे सुपूर्द; पोलीस प्रशासनाचा महिला सक्षमीकरणासाठी मोठा संदेश.

Khopoli Police – जागतिक महिला दिनानिमित्त खोपोली पोलीस स्टेशनच्या वतीने शहरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. नगरसेविका, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्त्या, पोलीस कर्मचारी, सफाई कामगार, तसेच आदिवासी महिला भाजी विक्रेत्या अशा विविध क्षेत्रातील महिलांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमात दिव्यांग मुला-मुलींनाही आमंत्रित करण्यात आले. महिला दिनानिमित्त खोपोली पोलीस स्टेशनचा प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक पूजा चव्हाण यांच्याकडे प्रतीकात्मक चार्ज सोपविण्यात आला. पोलीस स्टेशनमधील सर्व महत्त्वाच्या जबाबदाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनी सांभाळल्या. तसेच उपस्थित महिलांसाठी स्नेहभोजनाचे आयोजनही करण्यात आले.
यावेळी पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी सांगितले की, नारीशक्ती ही समाजाची जननी आणि भगिनी या दोन्ही स्वरूपात महत्त्वाची भूमिका बजावते. रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या कार्यशैलीतून प्रेरणा घेऊन महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.
तर प्रभारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक पूजा चव्हाण यांनी कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमाला खोपोली शहरातील शेकडो महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उपस्थित महिलांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.





