Khopoli News : खोपोलीकरांचा जीव टांगणीला! कोट्यवधींच्या ‘या’ योजनेमुळे ४० किमीचे रस्ते बनले मृत्यूचे सापळे
Khopoli News : गेल्या दोन वर्षांपासून अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था; दुचाकीस्वारांना करावी लागतेय मोठी कसरत, किरकोळ अपघातांमध्ये वाढ.

Khopoli News – खोपोली नगरपालिकेच्या भुयारी गटार योजनेचे काम गेल्या दोन वर्षांपासून संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे शहरातील अनेक रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. योजनेसाठी शहरातील अंतर्गत रस्ते खोदून ठेवण्यात आल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. काही ठिकाणी काम पूर्ण झाल्यानंतर तात्पुरते डांबरीकरण करण्यात आले असले, तरी संपूर्ण रस्त्यांचे व्यवस्थित डांबरीकरण झाले नसल्यामुळे पावसाळ्यात चिखलातून आणि खड्ड्यांतून प्रवास करावा लागणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
खोपोली नगरपालिकेकडून कोट्यवधी रुपयांच्या निधीतून भुयारी गटार योजना राबविण्यात येत आहे. शहरातील सांडपाणी व्यवस्थापन सुधारण्यासाठी ही योजना महत्त्वाची मानली जात असली, तरी कामाच्या संथ गतीमुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे. गेल्या दोन वर्षांपासून अनेक रस्त्यांवर खोदकाम सुरू असून अनेक भागांत काम अद्याप पूर्ण झालेले नाही.
भुयारी गटार योजनेसाठी खोदण्यात आलेले रस्ते यापूर्वी लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात आले होते. मात्र, खोदकामानंतर अनेक ठिकाणी केवळ तात्पुरते डांबरीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाले आहेत. परिणामी दुचाकीस्वारांना मोठा त्रास सहन करावा लागत असून किरकोळ अपघातांच्या घटनाही वाढत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
विशेषतः शहरातील अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून वाहनचालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. काही भागांमध्ये रस्त्यांची अवस्था इतकी खराब झाली आहे की नागरिकांना पायी चालणेही कठीण झाले आहे. सध्या खोपोली शहरातील अंदाजे ४० किलोमीटरच्या अंतर्गत रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याचे चित्र आहे.
पावसाळ्यात अपघातांची भिती
मे महिना संपत आला असून मान्सून कधीही दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत उघडे पडलेले रस्ते, खड्डे आणि अपूर्ण डांबरीकरण यामुळे पावसाळ्यात नागरिकांची मोठी गैरसोय होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पावसामुळे रस्त्यांवर चिखल साचण्याबरोबरच वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.
वारंवार तक्रारी करूनही दुर्लक्ष
अनेक ठिकाणी धूळ आणि खडीमुळे वातावरण प्रदूषित होत असून आरोग्याच्या समस्या निर्माण होत असल्याची तक्रारही करण्यात येत आहे. दरम्यान, नागरिकांनी नगरपालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही कामाच्या गतीत अपेक्षित सुधारणा होत नसल्याचा आरोप केला जात आहे. पावसाळ्यापूर्वी रस्त्यांचे दर्जेदार डांबरीकरण करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.






