PMC News : सोमवारी दुपारनंतर आलेल्या अवकाळी पावसामुळे अनेक भागांत पाणी साचले. या पाण्यासोबत पावसाळी वाहिन्यांची चेंबर्स तसेच नाल्यांमधील कचरा, गाळ वाहून गेला आहे. दुसरीकडे पावसाळी वाहिन्या, नाल्यांच्या स्वच्छतेसाठीच्या पालिकेने मागवलेल्या निविदा मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहेत. पावसाने कचरा आणि गाळ आधीच वाहून गेल्यानंतर आता ठेकेदारांकडून नेमकी कोणती स्वच्छता पालिका करून घेणार, असा प्रश्न आहे. पावसानेच केली स्वच्छता शहरात सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास अवकाळी पावसाला सुरुवात झाली. हिंजवडीकडून सुरू झालेल्या या पावसाने बालेवाडी, बाणेर, बावधन परिसरात जोरदार हजेरी लावली. त्यानंतर औंध, पाषाण, शिवाजीनगर, नगररस्ता, हडपसर, तसेच काही प्रमाणात सिंहगड रस्ता आणि कोथरूड परिसरालाही झोडपून काढले. हा पाऊस अचानक आणि मोठ्या प्रमाणात आल्याने शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर पाण्याच्या नद्या वाहताना दिसत होत्या. हे पाणी पुढे पावसाळी वाहिन्या आणि नाल्यांमधून नदीपात्रात गेले. त्यामुळे अनेक नाल्यांमध्ये साचलेला कचरा आणि गाळ मोठ्या प्रमाणात वाहून गेला आहे. पुणे महापालिका पावसाळी कामे अडली महापालिकेकडून यंदापासून पावसाळी कामांची जबाबदारी क्षेत्रीय कार्यालयांकडे देण्यात आली आहे. नियोजनानुसार ही कामे फेब्रुवारी अखेरीस सुरू होऊन मे अखेरीस पूर्ण होणे अपेक्षित आहे. मात्र, मार्च महिना संपत आला तरी या कामांच्या निविदांना अद्याप मंजुरी मिळालेली नाही. परिणामी, शहरात प्रत्यक्षात ही कामे सुरूच झालेली नाहीत. या कामांमध्ये नालेसफाई, पावसाळी वाहिन्यांची स्वच्छता तसेच ड्रेनेज चेंबरची सफाई यांचा समावेश आहे. दरम्यान, मे महिन्यापासूनच पूर्वमोसमी पावसाला सुरुवात होत असल्याने एप्रिल अखेरपर्यंत ही कामे पूर्ण करणे आवश्यक असते. मात्र, प्रशासनाकडून निविदा प्रक्रियेत झालेल्या विलंबामुळे आधीच उशीर झाला आहे. त्यातच अवकाळी पावसामुळे नाल्यांमधील कचरा आणि गाळ वाहून गेल्याने आता ठेकेदारांकडून नेमकी कोणती स्वच्छता केली जाणार, याबाबत प्रशासनाकडे समाधानकारक उत्तर नसल्याची स्थिती आहे.