Khopoli Municipal Council – खोपोली नगरपरिषदेची विशेष सभा मंगळवारी (दि. १७) पार पडली. या सभेत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगरसेवक कार्यरत असल्याचे नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी सांगितले. यावेळी उपनगराध्यक्ष विक्रम साबळे उपस्थित होते. नगराध्यक्ष शेंडे यांनी सांगितले की, दिव्यांग नागरिकांच्या पेन्शनमध्ये गेल्या पाच वर्षांत वाढ झाली नव्हती. त्यामुळे त्यांच्या आर्थिक अडचणी लक्षात घेऊन पेन्शनमध्ये ५०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच मालमत्ता करावरील शास्तीमध्ये ५० टक्के सूट देण्यास मान्यता देण्यात आली असून, १६१ अर्जदारांना ५० टक्क्यांपेक्षा जास्त सवलत देण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक १० मधील उमरजी पटेल नगर येथे श्रीराम मंदिराजवळ सामाजिक सभागृह उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. गगनगिरी महाराज आश्रमाकडे जाणारा रस्ता अरुंद असल्याने तो १८ मीटर रुंदीचा करण्याचा निर्णयही घेण्यात आला. जुना पुणे-मुंबई महामार्गावरील दुभाजकावर वृक्षलागवडीची देखभाल होत नसल्याने हनुमान मंदिर ते गुडलक चौक दरम्यान नगरपरिषदेच्या वतीने वृक्षलागवड करण्यात येणार आहे. तसेच सीएसआर निधीतून शहरातील शाळांमध्ये सोलार प्रणाली बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. आमदार महेंद्र थोरवे यांच्या शिफारसीनुसार अनुसूचित जाती उपाययोजना आणि नागरी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत विविध विकासकामांना मंजुरी देण्यात आली आहे. नळ कनेक्शन देताना रस्ता खोदकामाचा खर्च नागरिकांवर न टाकता तो नगरपालिकेकडूनच करण्यात येईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याची माहिती उपनगराध्यक्ष विक्रम साबळे यांनी दिली. सभेतील सर्व निर्णयांना नगरसेवकांनी एकमताने पाठिंबा दिल्याबद्दल नगराध्यक्ष शेंडे यांनी आभार व्यक्त केले.