8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाचा निवृत्त कर्मचाऱ्यांना लाभ कसा मिळणार? जाणून घ्या नियम
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन वाढणार का? १ जानेवारी २०२६ पूर्वी निवृत्त झालेल्यांना वाढीव पेन्शन आणि थकबाकी मिळण्याबाबतचे नियम जाणून घ्या.

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगामुळे केवळ सध्या सेवेत असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्याच वेतनात वाढ होणार आहे की निवृत्त कर्मचाऱ्यांनाही वाढीव पेन्शनचा लाभ मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेषतः १ जानेवारी २०२६ पूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोगाचा लाभ मिळणार का, याबाबत उत्सुकता आहे.
आयोगाच्या शिफारशी लागू होण्यास वेळ लागला, तरी त्याचा लाभ पूर्वलक्षी प्रभावाने दिला गेल्यास निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही थकबाकी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय केंद्र सरकार घेणार आहे.
१ जानेवारी २०२६ पासून लाभ मिळण्याची शक्यता
आठव्या वेतन आयोगाचा परिणाम १ जानेवारी २०२६ पासून अपेक्षित असल्याचे केंद्र सरकारने ऑक्टोबर २०२५ मध्ये प्रसिद्ध केलेल्या माहितीत म्हटले होते. मात्र, ही अधिकृत अंमलबजावणीची निश्चित तारीख नाही. आयोगाची स्थापना ३ नोव्हेंबर २०२५ रोजी झाली असून, त्याला शिफारशी सादर करण्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. अंमलबजावणीची तारीख सरकार निश्चित करणार आहे.
निवृत्त कर्मचाऱ्यांना थकबाकी कशी मिळू शकते?
समजा, एखादा कर्मचारी २०२७ मध्ये निवृत्त झाला आणि सरकारने वेतन आयोगाच्या शिफारशी १ जानेवारी २०२६ पासून लागू करण्याचा निर्णय घेतला, तर त्याला या तारखेपासून निवृत्तीपर्यंतच्या कालावधीतील सुधारित आणि जुन्या वेतनातील फरक थकबाकी म्हणून मिळू शकतो. मात्र, यासाठी सरकारच्या अंतिम आदेशात पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी आणि थकबाकी देण्याची तरतूद असणे आवश्यक आहे.
जुन्या पेन्शनधारकांचा समावेश होणार का?
आठव्या वेतन आयोगाच्या कार्यकक्षेत वेतन, भत्ते आणि निवृत्तिवेतनाशी संबंधित विषयांचा समावेश आहे. मात्र, १ जानेवारी २०२६ पूर्वी निवृत्त झालेल्या सर्व पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये सुधारणा होणार का, याबाबत स्पष्टता आवश्यक आहे.
काही पेन्शनधारक संघटनांनी यासंदर्भात आयोगाच्या कार्यकक्षेत बदल करण्याची मागणी केली आहे. जुन्या पेन्शन योजनेतील निवृत्त कर्मचारी तसेच कुटुंब निवृत्तिवेतनधारकांनाही सुधारित पेन्शनचा लाभ मिळावा, अशी त्यांची मागणी आहे. सरकारने याबाबत अंतिम निर्णय जाहीर केलेला नाही.
पेन्शनधारकांना अधिकृत निर्णयाची प्रतीक्षा
त्यामुळे आठव्या वेतन आयोगाचा लाभ नेमका कोणत्या निवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणार, पेन्शन किती वाढणार आणि थकबाकी कशी मोजली जाणार, हे अद्याप निश्चित झालेले नाही. आयोगाच्या शिफारशी, त्यावर सरकारची मंजुरी आणि अंमलबजावणीचे अंतिम आदेश यावर सर्व गणित अवलंबून असेल. त्यामुळे निवृत्त कर्मचारी आणि पेन्शनधारकांनी वाढीव पेन्शन किंवा थकबाकीबाबत निश्चित आकडे जाहीर झाल्याचे समजू नये.





