Sports Fund Disparity : ४२६ कोटींचा निधी अन् पदकांची संख्या ‘शून्य’! राष्ट्रकुल स्पर्धेनंतर ‘खेलो इंडिया’च्या क्रीडा निधीवाटपावर गंभीर प्रश्नचिन्ह
Sports Fund Disparity : केंद्र सरकारच्या 'खेलो इंडिया' योजनेअंतर्गत राज्यांना मिळणाऱ्या निधीची आणि त्यांच्या पदकांची तुलना केली असता एक अत्यंत धक्कादायक विरोधाभास समोर आला आहे.

Khelo India Sports Fund Allocation Commonwealth Games 2026 Gujarat Zero Medals : ग्लासगो येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘राष्ट्राकुल क्रीडा स्पर्धा २०२६’ (CWG 2026) मध्ये भारतीय खेळाडूंनी १३ सुवर्ण, १७ रौप्य आणि ९ कांस्य अशा एकूण ३९ पदकांची कमाई करत चौथे स्थान मिळवले. यंदा खर्चकपातीमुळे भारताची प्रमुख ताकद असलेले कुस्ती, बॅडमिंटन आणि नेमबाजी यांसारखे खेळ स्पर्धेत नसतानाही खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. मात्र, या स्पर्धेनंतर केंद्र सरकारच्या ‘खेलो इंडिया’ (Khelo India) योजनेअंतर्गत राज्यांना मिळणाऱ्या निधीची आणि त्यांच्या पदकांची तुलना केली असता एक अत्यंत धक्कादायक विरोधाभास समोर आला आहे.
गुजरातला ४२६ कोटींचा निधी, पण पदक ‘शून्य’ –
उपलब्ध आकडेवारीनुसार, उत्तर प्रदेशनंतर गुजरातला क्रीडा पायाभूत सुविधांसाठी तब्बल ४२६ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. मात्र, एवढा प्रचंड निधी मिळूनही ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत गुजरातच्या एकाही खेळाडूला पदक मिळवता आले नाही. इतकेच नव्हे तर, पॅरिस ऑलिंपिकमध्येही गुजरातच्या खात्यात शून्य पदक होते आणि खेलो इंडिया युथ गेम्समध्ये अवघ्या १३ पदकांसह गुजरात २१ व्या स्थानावर फेकला गेला होता. त्यामुळे ४२६ कोटींचा हा भलामोठा निधी नेमका कुठे खर्च होतो आणि त्यातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू का तयार होत नाहीत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हरियाणाचा जलवा; ६६ कोटींत जिंकली ११ पदके!
दुसऱ्या बाजूला हरियाणाची कामगिरी थक्क करणारी आहे. ‘खेलो इंडिया’अंतर्गत हरियाणाला केवळ ६६ कोटी रुपयांचा निधी मिळाला, मात्र त्यांच्या खेळाडूंनी राष्ट्रकुल स्पर्धेत तब्बल ११ पदके जिंकून देशाची मान उंचावली.
गुजरात को ₹426.13 करोड़, उत्तर प्रदेश को ₹438.27 करोड़ और हरियाणा को सिर्फ ₹66.59 करोड़ का Khelo India infrastructure fund!
लेकिन Commonwealth Games में हरियाणा ने 11 medals जीते।
फिर सवाल क्यों न उठे?
मोदी सरकार खेलों के विकास के नाम पर पैसा किस आधार पर बांट रही है?
क्या देश… pic.twitter.com/JewdSXI89t— Arun Kumar (@arunbwn) August 9, 2026
तसेच महाराष्ट्राला ८७ कोटींचा निधी मिळाला असून महाराष्ट्राच्या खेळाडूंनी २ पदके जिंकली, शिवाय खेलो इंडिया युथ गेम्समध्ये सलग तीन वेळा चॅम्पियन होण्याचा मानही मिळवला. अवघ्या ३० ते ३५ लाख लोकसंख्येच्या मणिपूरला ४७ कोटींचा निधी मिळाला असताना त्यांच्या खेळाडूंनी ४ पदके देशाच्या झोळीत टाकली.
२०२८ चे यजमानपद अहमदाबादकडे!
कुस्ती, नेमबाजी आणि बॅडमिंटन हे खेळ नसल्यामुळे भारताची एकूण पदकसंख्या घसरल्याचे दिसत असले तरी क्रीडा निधीचे विषम वाटप चर्चेचा विषय ठरले आहे. या संपूर्ण चर्चेला महत्त्वाचा संदर्भ म्हणजे २०२८ च्या १०० व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे यजमानपद गुजरातमधील अहमदाबाद शहराला मिळाले आहे. त्यामुळे आता गुजरातला मिळणाऱ्या अब्जावधींच्या निधीचा योग्य वापर करून खेळाडू घडवण्यावर सर्वांचे लक्ष असणार आहे.






