Khed Protest : खेड तहसीलवर शिवसैनिकांचा एल्गार ; शेतकरी प्रश्नांवर सरकारला घेरलं

प्रभात वृत्तसेवा
राजगुरुनगर – राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना मदत व न्याय मिळावा या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना खेड तालुक्याच्यावतीने खेड तहसीलदार कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.विधानसभेच्या निवडणुकीत विद्यमान सरकारने शेतकर्यांना सरसकट कर्जमुक्तीचे आश्वासन दिले होते; मात्र वर्ष उलटूनही या आश्वासनावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
सततच्या नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, गारपीट, वाढलेला उत्पादन खर्च, महागडी खते-औषधे यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. पिकांना हमीभाव न मिळाल्याने शेतकरी बँका व सावकारांच्या कर्जाखाली दबले गेले आहेत. अनेक शेतकर्यांना नोटीस, जप्ती कारवाईला सामोरे जावे लागत असून काहींनी आत्महत्येसारखे टोकाचे निर्णय घेतले आहेत.
या पार्श्वभूमीवर शेतकर्यांना उभारी देण्यासाठी सरसकट कर्जमुक्ती हाच प्रभावी उपाय असल्याचे शिवसेनेचे नेते म्हणाले. ही कर्जमुक्ती बकबाकीदार, चालू बाकीदार यांच्यासह अल्प मुदतीचे पीककर्ज, मध्यम मुदतीचे सिंचन, उपकरण, शेडनेट, पॉलीहाऊस, दुध उत्पादक शेतकर्यांचे तसेच सावकारी कर्ज यांनाही लागू करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना (उबाठा) गटाचे जिल्हाध्यक्ष अशोक खांडेभराड व महिला जिल्हा संघटक विजया शिंदे यांनी केले. यावेळी तालुका प्रमुख रामदास धनवटे, उपजिल्हा प्रमुख शिवाजी वर्पे, समन्वयक अमोल पवार, ग्राहक सेल जिल्हा प्रमुख बाळासाहेब ताये, युवा सेना तालुका महिला प्रमुख उर्मिला सांडभोर, तालुका प्रमुख मृगेश काळे, शहर प्रमुख दिलीप तापकीर, सुदाम कराळे, पप्पू राक्षे, किरण गवारे, सुभाष मांडेकर आदींसह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. या वेळी आंदोलनाचे सूत्रसंचालन सुदाम कराळे यांनी केले. मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार राम बीजे यांनी स्वीकारले.
आंदोलनातील प्रमुख मागण्या :
–अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी शेतकर्यांना हेक्टरी 50, 000 इतकी थेट आर्थिक मदत जाहीर करावी.
-राज्यातील सर्व शेतकर्यांना सर्व प्रकारच्या कर्जातून मुक्त करावे.
-पीक विम्याचे कठीण निकष शिथिल करून पंचनाम्याविना विमा रक्कम थेट शेतकर्यांच्या खात्यात जमा करावी.
-अतिवृष्टीमुळे घरे व जनावरांचे नुकसान झालेल्या नागरिकांना जुने निकष न लावता योग्य व पुरेसा मोबदला द्यावा.
“बळीराजाचे दुःख सरकारला कळत नाही. शेतकरी अडचणीत असताना सरकार मदत न करता त्याचाच खिसा कापण्याचे काम करते. त्यामुळे या सरकारचा निषेध करण्यात आला.”
-विजया शिंदे, महिला जिल्हा संघटक शिवसेना
“महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे हजारो कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. शेतकरी बेघर झाला आहे. सरकारने केवळ आश्वासने न देता हेक्टरी 50 हजारांची मदत जाहीर करावी आणि शेतकर्यांचा सातबारा कोरा करावा.”
-अशोक खांडेभराड, जिल्हाध्यक्ष शिवसेना





