Khed News : आमदार बाबाजी काळेंनी शब्द पाळला! कुंडेश्वर मंदिर घाट रस्त्याच्या कामासाठी सरकारकडून निधी मंजूर

प्रभात वृत्तसेवा
राजगुरुनगर – कुंडेश्वर मंदिर (पाईट) येथील मंदिराकडे जाणार्या घाटात भविष्यातील संभाव्य अपघात टाळण्यासाठी जिल्हा नियोजन निधीतून तब्बल 95 लाख 77 हजार रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली असल्याची माहिती आमदार बाबाजी काळे यांनी दिली.खेड तालुक्यातील श्री कुंडेश्वर (पाईट) हे जागृत देवस्थान आहे. येथे राज्यभरातील अनेक भाविक भक्त दर्शनासाठी पर्यटनासाठी येत असतात. पाईट आणि पंचक्रोशीतील नागरिकांच्या मदतीने या देवस्थानचा विकास केला जात आहे.
घाट रस्ता असल्याने तो धोकेदायक आहे. श्री कुंडेश्वर येथे 11 ऑगस्ट 2025 रोजी दर्शनासाठी जात असताना कुंडेश्वर मंदिराच्या डोंगर घाटात भाविकांच्या वाहनाला मोठा अपघात झाला होता. या अपघातात 12 महिला भाविकांचा मृत्यू झाला होता. या अपघातात 28 महिलांसह 4 मुले गंभीर जखमी झाली होती. या अपघातानंतर खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हाधिकारी पुणे याच्याकडे या मंदिराकडे जाणार्या रस्त्याचा धोका लक्षात घेता संभाव्य अपघात टाकळण्यासाठी तात्काळ उपायोजना करावी, अशी मागणी केली होती.
याबाबत लेखी पत्रव्यवहार करत मुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्याशी चर्चा केली होती.पाईट ग्रामीण मार्ग 107 ते कोंबडवाडी कुंडेश्वर मंदिर ग्रामीण मार्ग क्र. 189 या रस्त्याच्या घाट लांबीत संभाव्य अपघात टाळण्यासाठी सुरक्षितता योजनांचे काम करणेबाबाबत निधी मिळावा, यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी पत्रव्यवहार केला होता.
यासह प्रत्यक्ष भेट घेऊन उपाययोजना करण्यासाठी निधी मिळण्याची मागणी केली होती. सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे जिल्हा नियोजन निधीतून 95 लाख 77 हजार रुपयांचा निधीस पालकमंत्री अजित पवार, जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी तातडीने मंजुरी दिली आहे. या कमला प्रशासकीय मान्यता आदेश देण्यात आला आहे. लवकरच हे काम सुरु होईल, असे आमदार बाबाजी काळे यांनी सांगितले.




