Khed News : रस्ता खड्ड्यात की खड्ड्यात रस्ता? किवळे-कोरेगाव खुर्द फाट्यावर वाहनचालकांचा जीव धोक्यात
Khed News : चाकण एमआयडीसीतील कामगार आणि शेतकरी दररोज करत आहेत जीव मुठीत धरून प्रवास; पावसाळ्यापूर्वी रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर.

Khed News – खेड तालुक्यातील चास ते म्हाळुंगे या प्रमुख जिल्हा मार्गावरील किवळे ते कोरेगाव खुर्द फाटा हा रस्ता सध्या अक्षरशः खड्ड्यांत हरवला असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक आणि कामगारांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
चाकण एमआयडीसीमध्ये कामासाठी जाणारे हजारो कामगार दररोज या मार्गाचा वापर करतात. तसेच शेतकरी शेतमाल बाजार समितीत नेण्यासाठी आणि भीमाशंकरकडे जाणार्या पर्यायी मार्गासाठीही हा रस्ता महत्त्वाचा मानला जातो. मात्र रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याने वाहन चालवणे धोकादायक बनले आहे. रस्त्यावरील डांबर पूर्णपणे उखडले असून अनेक ठिकाणी खोल खड्डे पडले आहेत.
पावसाळा तोंडावर असल्याने खड्ड्यांमध्ये पाणी साचून परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून खड्डे बुजवण्याचे काम केले जात असले तरी निकृष्ट दर्जाच्या साहित्यामुळे भरलेले खड्डे दोनच दिवसांत पुन्हा उखडत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. स्थानिक ग्रामस्थ संकेत सरोदे, दत्ता डावरे, सुनील मांडेकर आणि तुकाराम डावरे यांनी प्रशासनाकडे तातडीने रस्ता दुरुस्ती व काँक्रीटीकरणाची मागणी केली आहे.
दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. कामगारांना वेळेत एमआयडीसीमध्ये पोहोचणे कठीण झाले आहे. पावसाळ्यात परिस्थिती आणखी भीषण होईल, अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने रस्त्याची पाहणी करून कायमस्वरूपी काँक्रीटीकरण करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.





