Khed News: जागा द्या, अन्यथा आंदोलन तीव्र करू!आदिवासी ठाकर समाजाचा एल्गार; आप आणि ‘आरपीआय’चा इशारा

प्रभात वृत्तसेवा
राजगुरूनगर – कडधे (ता. खेड) गावातील ठाकर समाजासाठी मंजूर घरकुलांना तात्काळ जागा उपलब्ध करून द्यावी. या प्रकरणात दिरंगाई करणार्या संबंधितांवर त्वरित कारवाई करण्यात यावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा आरपीआय पुणे जिल्हा श्रमिक ब्रिगेडचे अध्यक्ष संतोषनाना डोळस यांनी दिला.कडधे गावातील ठाकर समाजाच्या घरकुल प्रश्नासंदर्भात विविध मागण्यांसाठी आम आदमी पार्टी, खेड तालुका यांच्या वतीने आज खेड पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व आम आदमी पार्टीचे खेड तालुका अध्यक्ष स्वप्नील गायकवाड यांनी केले. आंदोलनात बोलताना स्वप्नील गायकवाड म्हणाले, आदिवासी ठाकर समाजाला शासनाकडून जागा मंजूर असतानाही ग्रामपंचायतीकडून आडकाठी घालण्यात येत आहे. हा प्रश्न अत्यंत गंभीर असून कडधे गावासह कान्हेवाडी, मोहकल, कमान, कडूस, दोंदे आदी गावांमध्येही आदिवासी बांधवांवर अन्याय होत आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी.
आरपीआय पुणे जिल्हा श्रमिक ब्रिगेडचे अध्यक्ष संतोषनाना डोळस म्हणाले, ठाकर समाजातील कुटुंबांना शासनाने घरकुलांसाठी जागा मंजूर केली असतानाही ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावर अडथळे निर्माण होत आहेत. संबंधित कुटुंबांना घरकुल बांधण्यासाठी तात्काळ जागेचा ताबा द्यावा. या प्रक्रियेत अडथळा आणणार्यांवर कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल. दरम्यान, गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले.
ते म्हणाले, कडधे गावातील ठाकर कुटुंबांबाबत घरकुल विषयावर आतापर्यंत चार बैठका घेण्यात आल्या आहेत. त्यांच्यासाठी जिल्हाधिकारी पुणे यांनी 40 गुंठे जागा मंजूर केली असून त्या ठिकाणी कॉलनी उभारण्यात आली आहे. आणखी 14 घरकुले मंजूर असून त्यापैकी 7 घरकुलांचे काम सुरू आहे. ठाकर समाजाची कोणतीही फसवणूक झाली नाही आणि होणारही नाही.
उर्वरित सात कुटुंबांना तात्काळ जागा उपलब्ध करून दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या आंदोलनात आरपीआय पुणे जिल्हा श्रमिक ब्रिगेड, वंचित बहुजन आघाडी यांच्यासह कडधे गावातील पुरुष व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आदिवासी ठाकर कुटुंबांच्या प्रमुख मागण्या
मंजूर घरकुलांसाठी जागेचा त्वरित ताबा द्यावा, जागा देण्यास टाळाटाळ करणार्या दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, वंचित आदिवासी कुटुंबांच्या घरनौंदी तात्काळ ग्रामपंचायत दप्तरी नोंदवाव्यात, या मागण्यांसाठी राजगुरूनगर येथे खेड पंचायत समितीसमोर आम आदमी पार्टीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाला वंचित बहुजन आघाडी व रिपब्लिकन पार्टी (आठवले गट) यांचा पाठिंबा मिळाला.





