Khed Murder Case : आत्महत्या की घातपात? खेड तालुक्यातील महिलेच्या मृत्यूचे गूढ उकलले; आरोपीला बेड्या
Khed Murder Case : खेड तालुक्यातील सोळू येथे शुक्रवारी घडले हत्याकांड; ३० वर्षीय महिलेच्या हत्येने परिसरात भीतीचे वातावरण.

Khed Murder Case – महिला आणि एक व्यक्ती कामावर एकत्र जात असताना खेड तालुक्यातील सोळू येथे जंगलात महिलेचा गळा आवळून खून केला. त्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने महिलेच्या गळ्याला स्कार्प बांधून मृतदेह झाडाला अडकवून आत्महत्या केल्याचा बनाव केला. ही घटना शुक्रवारी (दि. २० फेब्रुवारी) सायंकाळी चार वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पार्वती दराडे (वय ३०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक कुमार गिरीगोसावी यांनी शनिवारी (दि. २१) आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विष्णू महादेव पावडे (वय ३२, रा. मूळ रा. हदगाव, परभणी, सध्या रा. धानोरे, खेड) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत पार्वती दराडे आणि आरोपी विष्णू पावडे हे एकमेकांच्या ओळखीचे होते.
ते एकत्रित कामासाठी घराबाहेर पडल्यानंतर दुचाकीवरून शुक्रवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास ते दोघेही सोळु येथील जंगलात गेले. तिथे आरोपी विष्णूने पार्वतीचा गळा आवळून खून केला. गुन्हा लपवण्यासाठी त्याने मृतदेह एका झाडाला स्कार्फच्या साहाय्याने ४ फूट उंचीवर बांधून ती आत्महत्या असल्याचे भासवले. आरोपी घटनास्थळावरून पळून गेला होता, मात्र पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. आळंदी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.





