Khed Election Results : खेडमध्ये राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला सुरुंग! शिवसेना (उबाठा)चे निर्विवाद वर्चस्व; भाजप-शिंदेंची अवस्था काय?
Khed Election Results : खेड तालुक्यात सत्तांतराची लाट कायम; विधानसभा निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवरही शिवसेना (उबाठा) गटाचे वर्चस्व.

Khed Election Results – खेड तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला निर्विवाद वर्चस्व मिळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत शिवसेना उबाठा गटाने तालुक्यात सत्ता परिवर्तन घडवून आणले आहे. राज्यात खेड तालुका हा उबाठा गटाला स्पष्ट बहुमत देणारा महत्त्वाचा तालुका ठरला आहे. पंचायत समितीच्या 16 जागांपैकी 9 जागांवर विजय मिळवत शिवसेना उबाठा गटाने पंचायत समितीवर निर्विवाद सत्ता प्रस्थापित केली आहे.
खेड तालुक्यात सत्ता परिवर्तनाची लाट गेल्या काही काळापासून कायम राहिली आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीपासून तालुक्यातील राजकीय बदलाला सुरुवात झाली. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांत शिवसेना उबाठाचे आमदार बाबाजी काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा पराभव करत सत्तांतर घडवून आणले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तालुक्यात उतरती कळा लागल्याचे चित्र दिसू लागले.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले असून, परिवर्तनाची लाट कायम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. निवडणूक प्रचाराच्या काळात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन झाल्याचा खेड तालुक्यातील निकालांवर मोठा परिणाम झाल्याची चर्चा आहे. अजित पवार यांनी तालुक्यात केलेल्या विकासकामांच्या ‘हिमगिरी पर्वताला’ मतदारांनी नकार दिल्याचे चित्र निकालातून समोर आले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खेड तालुक्यात प्रचारसभा घेतल्या तरी जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांना यश मिळाले नाही. पंचायत समितीमध्ये केवळ एका जागेवर त्यांना समाधान मानावे लागले. देशात व राज्यात सत्ता असलेल्या भाजपला या निवडणुकीत सपशेल अपयश आले. भाजपकडून काही उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली होती; मात्र त्यांनी ऐनवेळी माघार घेतल्याने तालुक्यात भाजपचा अक्षरशः सुपडा साफ झाला आहे.
लक्ष्मी दर्शनला मतदार भुलला
खेड तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका मोठ्या प्रमाणात पैशावर आधारित झाल्याची जोरदार चर्चा आहे. निवडणुकीत धनशक्ती सरस ठरल्याचे चित्र असून, पैशांचा अक्षरशः महापूर वाहिला. मूलभूत विकासकामांपेक्षा केवळ आश्वासने व लक्ष्मी दर्शन यावरच निवडणूक जिंकली गेल्याचे बोलले जात आहे. रेटवडी, कुरुळी, नाणेकरवाडी, पिंपळगाव तर्फे खेड, मेदनकरवाडी आदी जिल्हा परिषद गटांमध्ये मोठ्या प्रमाणात पैशाचा पाऊस पडल्याची चर्चा आहे. हीच स्थिती पंचायत समितीच्या काही गणांमध्येही झाल्याचे नागरिक सांगत आहेत.
गड आला पण सिंह गेला
खेड तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाला पाच, तर राष्ट्रवादी काँग्रेसला तीन जागा मिळाल्या. बालेकिल्ला समजल्या जाणार्या खेड तालुक्यात राष्ट्रवादीला सत्ता स्थापन करता आली नाही. पाईट जिल्हा परिषद गटात आमदार बाबाजी काळे यांच्या भगिनी राजश्री जैद यांचा सुनीता शरद बुट्टे पाटील यांनी 401 मतांनी पराभव केल्याने गड आला पण सिंह गेला अशी स्थिती निर्माण झाली आहे.
निसटते पराभव, चुरशीच्या लढती
खेड तालुक्यात सर्वाधिक चुरस रेटवडी-वाफगाव जिल्हा परिषद गटात पाहायला मिळाली. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उबाठा या तीन पक्षांमध्ये कडवी लढत झाली. या गटात शिवसेना उबाठाच्या दीप्ती भोगाडे यांनी शिवसेनेच्या रोहिणी थिगळे यांचा 704 मतांनी पराभव केला. पंचायत समितीच्या आंबेठाण गणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रद्धा मांडेकर यांनी शिवसेना उबाठाच्या रोहिणी सचिन पडवळ यांचा अवघ्या 16 मतांनी पराभव केला. वाडा पंचायत समिती गणात शिवसेनेच्या मनीषा गणेश हिले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्योती शंकर मोरमारे-डामसे यांचा 342 मतांनी पराभव केला.






