Khed Accident : तळेगाव रोडवर काळजाचा थरकाप! भरधाव टेम्पोच्या धडकेत पती-पत्नीचा जागीच मृत्यू
Khed Accident : चाकण-तळेगाव रोडवरील वाहतुकीच्या वेगाने घेतला दोन बळी; भांबोली परिसरात हळहळ, महाळुंगे पोलिसांकडून अपघाताचा सखोल तपास सुरू.

Khed Accident – भरधाव वेगात येणाऱ्या टेम्पोने रस्ता क्राॅस करीत असलेल्या मोटारसायकलला जोराची धडक दिली. या अपघातात पती-पत्नीचा मृत्यू झाला. हा अपघात खेड तालुक्यातील भांबोली गावाजवळ शनिवारी (दि. ७ मार्च) रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास चाकण-तळेगाव रोडवर घडला.
मनोहर शिवराम मेंगळे (वय ३६) आणि त्यांची पत्नी गीता मनोहर मेंगळे (वय ३४, दोघेही रा. भांबोली, मळकाई वस्ती, ता. खेड) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. राजू बाबू मसळे (वय ४०, सध्या रा. आंबेठाण, ता. खेड; मूळ रा. राजेवाडी, ता. आंबेगाव, जि. पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत हरीभाऊ शिवराम मेंगळे (वय ३९, रा. भांबोली, मळकाई वस्ती, ता. खेड) यांनी रविवारी (दि. ८) याबाबत उत्तर म्हाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याच्या ताब्यातील अशोक लेलँड टेम्पो भरधाव वेगाने चालवत रस्ता ओलांडत असलेल्या मोटारसायकलला समोरून धडक दिली. या अपघातात मोटारसायकलवरील मनोहर मेंगळे आणि गीता मेंगळे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास महाळुंगे पोलीस ठाणे करीत आहे.





