Khatav News: कॉलेजच्या बाहेर रोडरोमिओंचा धिंगाणा! पोलिसांचा अचानक छापा अन् ३६ जण जाळ्यात; काय घडलं?
Khatav News: खटाव परिसरात विनापरवाना व अल्पवयीन वाहनचालकांचे धाबे दणाणले; सह पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईचा बडगा.

Khatav News – खटाव येथील शहाजीराजे कॉलेज परिसर, बाजारपेठ आणि बसस्थानक परिसरात हुल्लडबाजी करणार्या रोडरोमिओंसह अल्पवयीन व बेशिस्त वाहनचालकांना पुसेगाव पोलीस व निर्भया पथकाने संयुक्तपणे नाकाबंदी करून केलेल्या कारवाईत तब्बल 36 वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. या कारवाईत 23 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
खटाव परिसरात शाळा व महाविद्यालयाच्या वेळेत काही तरुणांकडून दुचाकींवरून हुल्लडबाजी, ट्रिपलसीट प्रवास, तसेच कर्कश आवाज करणारे सायलन्सर आणि प्रेशर हॉर्नचा वापर केला जात असल्याच्या तक्रारी होत्या. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी बेशिस्त वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.
त्यानुसार पुसेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे यांच्या मार्गदर्शनाखाली खटाव येथील शहाजीराजे कॉलेज परिसर, बाजारपेठ व बसस्थानक परिसरात विशेष नाकाबंदी करण्यात आली. या मोहिमेदरम्यान विनापरवाना वाहन चालविणारे, ट्रिपल सीट प्रवास करणारे तसेच अल्पवयीनांकडून वाहन चालविण्याचे प्रकार आढळून आल्याने संबंधितांवर कारवाई करण्यात आली.
कर्कश आवाज करणारे सायलन्सर व प्रेशर हॉर्न वापरणार्या रोड रोमिओंविरुद्धही कारवाई करून संबंधित साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई कोरेगावच्या पोलीस उप अधीक्षक राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे, वाहतूक पोलीस अंमलदार संतोष बागल, बापुराव नवत्रे, राहुल जाधव, निर्भया पथकाचे पोलीस अंमलदार विजय बर्गे, तसेच होमगार्ड मयूर सकटे, सौरभ शिरतोडे, विकास खवळे व गणेश कदम यांच्या पथकाने केली.




