Khatav Crime: संतापजनक प्रकार! स्वतःच्याच मुला-सुनांनी ७० वर्षीय वृद्ध आईला बेदम मारहाण केली
Khatav Crime: घराजवळ गाडीतून उतरताच अचानक मारहाण; ग्रामस्थांच्या मदतीने साताऱ्यात उपचारार्थ दाखल, पुसेगाव पोलिसांकडून चौघांविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद.

Khatav Crime – खटाव तालुक्यातील चिंचणी (पो. डिस्कळ) येथे कौटुंबिक वादातून गोदाबाई भगवान अहिबळे (वय ७०) या वृद्ध महिलेला तिच्या दोन मुलांनी आणि सुनांनी मिळून हाताने बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्या जमिनीवर कोसळून डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने बेशुद्ध पडल्या. त्यांच्यावर सातारा येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी तक्रारदार सौ. अश्विनी अंकुश अहिबळे (वय ३३, रा. चिंचणी) यांच्या जबानीवरून चौघांविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुसेगाव पोलीस टाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दि. २१ रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास चिंचणी गावातील जुन्या घरासमोर ही घटना घडली. जखमी गोदाबाई या ग्रामपंचायतीकडून बोलेरो गाडीतून घराजवळ आल्या. गाडीतून खाली उतरताच,
तिथे आधीच थांबलेल्या गणेश भगवान अहिबळे, सौ. रेश्मा गणेश अहिबळे, लहु भगवान अहिबळे, सौ. सोनाली लहु अहिबळे या त्यांच्या दोन मुलांनी व सुनांनी संगनमत करुन कोणत्याही कारणाशिवाय गोदाबाई यांना हाताने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या अचानक झालेल्या मारहाणीमुळे गोदाबाई अहिबळे पाठीमागे जमिनीवर आदळल्या. त्यांच्या डोक्याच्या मागील भागास मुका मार लागल्याने त्या जागीच बेशुद्ध पडल्या.
घटनेचे गांभीर्य पाहून गावातील राम निकम आणि सोमनाथ निकम यांनी तातडीने चारचाकी गाडी आणून जखमी गोदाबाई यांना साताऱ्यातील गौरी डायग्नोस्टिक सेंटर येथे एम.आर.आय. करण्यासाठी नेले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी सातारा येथील यशवंत हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेबाबत यशवंत हॉस्पिटल येथे पोलिसांनी घेतलेल्या जबाबानुसार, अदखलपात्र अहवाल क्रमांक ४७९/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम ११५ (२) व ३ (५) अन्वये नोंद करण्यात आली आहे. हवालदार प्रमोद कदम प्रतिबंधक कारवाई करत आहेत.





