Mallikarjun Kharge : “ज्ञानेश कुमार यांना वाचवण्यासाठी केंद्र प्रयत्नशील” – मल्लिकार्जुन खर्गे
१ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर होणाऱ्या ‘दिल्ली चलो’ मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन खर्गे यांनी जनतेला केले.

Mallikarjun Kharge – देशात मतचोरीच्या अनेक घटना समोर येऊनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोमवारी केला. त्यांनी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणीही पुन्हा केली.
सोशल मीडियावरील पोस्टमध्ये खर्गे यांनी निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणासाठी (एसआयआर) वापरल्या जाणाऱ्या सॉफ्टवेअरची माहिती माहिती अधिकारांतर्गत (आरटीआय) मागितली असता, आयोगाने व्यापारी गुपितांचे कारण देत ती देण्यास नकार दिल्याचा दावा त्यांनी केला.
उत्तर प्रदेशातील १६.१८ लाख फॉर्म-६ अर्जांचा तपशील सार्वजनिक करण्यात आलेला नसल्याचे खर्गे यांनी म्हटले. तसेच, पीलीभीतमधील १०,४७० मतदारांच्या नोंदींमध्ये अनियमितता आढळल्याचा दावा करत, राज्यभरातील फॉर्म-६, ७ आणि ८ अर्जांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीने तीन प्रमुख मागण्या केल्याचे खर्गे यांनी सांगितले. त्यामध्ये मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा, त्यांना संरक्षण देणारा २०२३ चा कायदा रद्द करणे आणि एसआयआर प्रक्रिया तातडीने थांबवणे यांचा समावेश आहे.
मतदार यादीतून वगळलेली पात्र मतदारांची नावे पुन्हा समाविष्ट करावीत आणि सर्व निवडणुका कागदी मतपत्रिकांद्वारे घ्याव्यात, अशीही आघाडीची मागणी आहे. या मागण्यांसाठी १ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर होणाऱ्या ‘दिल्ली चलो’ मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन खर्गे यांनी जनतेला केले. हा लढा केवळ मतांचा नसून संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी असल्याचे त्यांनी म्हटले.






