खर्गे केवळ नावालाच हिंदू; प्रमोद कृष्णम यांची टीका

नवी दिल्ली : कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची तुलना दहशतवाद्यांशी केल्याने जोरदार वाद सुरू झाला आहे. या प्रकरणावर काँग्रेसचे माजी नेते आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले की, मल्लिकार्जुन खर्गे हे केवळ नावाने हिंदू आहेत, त्यांचे कर्म मात्र अजिबात हिंदूसारखे नाहीत.
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले, मल्लिकार्जुन खर्गे हे त्यांच्या नावावरून हिंदू वाटतात पण त्यांच्या कृतीतून ते हिंदू आहेत असे वाटत नाही. त्यांनी आधी ते कोण आहेत, ते हिंदू आहेत की नाही हे सांगायला हवे. अशा प्रकारे कोणीही संत आणि महात्मे यांचा अपमान करत नाही. यांच्या बोलण्यावरून असे दिसते की ते सनातन धर्मावर चिडले आहेत आणि सनातनवर चिडणाऱ्या कोणा व्यक्तीला भारतात राजकारण करण्याचा अधिकार आहे असे आपल्याला वाटत नाही.
ते पुढे म्हणाले, जो सनातनच्या विरोधात आहे, तो भारताच्या विरोधात आहे. जो भारताच्या विरोधात आहे, तो सनातनच्या विरोधात आहे. खर्गे इतके ज्येष्ठ नेते आहेत की, हिंदू संतांचा, सनातनचा आणि भगव्याचा अपमान करणे त्यांना शोभत नाही. हा ऋषी प्रधान आहे. त्यामुळे येथे हिंदू सनातनचा अपमान करणार नाहीत. योगी आदित्यनाथ यांच्यावर एवढ्या खालच्या स्तरावरील टीका खर्गे यांना शोभणारी नाही.





