Khalapur Police: खालापूर फाट्यावर पोलिसांची धडक कारवाई! हेल्मेट नसणाऱ्या १०३ जणांना बसला मोठा फटका
Khalapur Police: जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील खालापूर फाट्यावर वाहतूक शाखा आणि स्थानिक पोलिसांची धडक मोहीम; १०३ चालकांकडून १.०३ लाखांचा दंड वसूल.

Khalapur Police – रस्ता सुरक्षा आणि अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन खालापूर पोलीस व वाहतूक शाखेने विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबवत धडक कारवाई केली. या मोहिमेत तब्बल १०३ विना हेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई करून १ लाख ३ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. रायगड जिल्हा पोलीस प्रशासनाच्या निर्देशानुसार, शुक्रवारी सायंकाळी जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील खालापूर फाटा परिसरात ही मोहीम राबविण्यात आली.
हेल्मेट न घालता दुचाकी चालविणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करण्यात आली. गेल्या काही दिवसांत खालापूर तालुक्यात झालेल्या दुचाकी अपघातांमध्ये अनेक चालकांनी हेल्मेट न घातल्याचे निदर्शनास आले होते. काही अपघातांमध्ये चालकांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून काहींना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे अपघातातील मृत्यू आणि गंभीर जखमींचे प्रमाण कमी करण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या आदेशानुसार तसेच अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे आणि उपविभागीय पोलीस अधीक्षक डॉ. विशाल नेहूल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेत वाहतूक शाखेचे उपनिरीक्षक राजेंद्र आरोळे, पोलीस कर्मचारी किरण शेळके, जयेश कुथे, अजित सुपेकर, शनिराजे हारजे, कोमल ओंबळे आणि मनीषा केंद्रे यांनी सहभाग घेतला.
“अलिकडे अपघातांमध्ये हेल्मेटचा वापर न केल्यामुळे अनेकांना गंभीर दुखापती झाल्या आहेत. त्यामुळे सर्व दुचाकी चालक तसेच मागे बसणाऱ्या व्यक्तींनीही हेल्मेटचा वापर करावा. वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित प्रवास करावा आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे.”
– सचिन पवार, पोलीस निरीक्षक, खालापूर पोलीस ठाणे





