हिंगोली: कळमनुरी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र. ३६१ वर हिवरा पाटीजवळ रविवारी सकाळी साडेअकरा वाजता झालेल्या एका भीषण अपघातात दुचाकीस्वार पतीचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे. गणपूर कामठा (जि. नांदेड) येथे लग्न समारंभासाठी जात असताना, कळमनुरी येथील ज्ञानेश्वर पांडुरंग डाखोरे (वय २८) आणि त्यांची पत्नी शालिनी (वय २५) यांच्या दुचाकीला (एमएच २६ सीएल ००३४) राँग साईडने भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, ज्ञानेश्वर डाखोरे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. पत्नी शालिनी ज्ञानेश्वर डाखोरे गंभीर जखमी झाल्या असून, त्यांना तातडीने नांदेड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर बसवंते व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह डोंगरकडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. मृत ज्ञानेश्वर यांच्या पश्चात एक मुलगी, एक मुलगा, आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे. अपघातानंतर ट्रॅक्टर चालक फरार झाला असून, पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत.