Khalapur News: “शेकाप संपला की संपवला, हे दाखवून देऊ!” वर्धापनदिनाला जयंत पाटलांची विरोधकांवर तोफ
Khalapur News: 'इंडिया' आघाडीत शेकाप महत्त्वाचा घटक; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि आमदार रोहित पवारांचे सहकार्याचे आश्वासन.

Khalapur News – शेतकरी कामगार पक्षाचा ७९ वा वर्धापन दिन रविवारी (दि. २) उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाभरातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी खालापूर शहरातून ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. सोमया कोरडे यांच्या हस्ते पक्षाचे ध्वजारोहण करण्यात आले. जिल्हाध्यक्षा शिवानी जंगम आणि तालुका चिटणीस किशोर पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
यावेळी शेकापचे जिल्हा चिटणीस जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना, पराभवानंतर पक्ष खचलेला नसल्याचे स्पष्ट केले. तुम्हीही खचू नका. रायगड जिल्ह्यात शेकाप संपला की संपवला, हे भविष्यात दाखवून देऊ, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. कामगार, शेतकरी, कष्टकरी, युवक आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी लढा अधिक जोमाने सुरू ठेवण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस (शप)चे आमदार रोहित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख, माजी आमदार बाळाराम पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे, सुरेश खैरे, चित्रलेखा पाटील, प्रशांत नाईक, सुप्रिया पाटील यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार रोहित पवार यांनी शेकापची शेतकरी चळवळ आणि पक्षाची ऐतिहासिक परंपरा अधोरेखित केली.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी इंडिया आघाडीत शेकाप हा महत्त्वाचा घटक असल्याचे सांगत रायगडमध्ये पक्ष बळकट करण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. महिला आघाडी प्रमुख शिवानी जंगम यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात वर्धापनदिन यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आठ दिवस परिश्रम घेतल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी तालुका चिटणीस किशोर पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.





