Ambenali Ghat : रायगड आणि सातारा जिल्ह्यांच्या सीमेवरील आंबेनळी घाटात रविवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात सातारा जिल्ह्यातील आसगाव (ता. कोरेगाव) येथील तरुणांना घेऊन जाणारी स्कॉर्पिओ गाडी (एमएच ११ डीएनए २३४०) खोल दरीत कोसळून आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे सातारा जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. महाबळेश्वर- पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात एका तीव्र वळणावर चालकाचा अंदाज चुकल्याने ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. स्कॉर्पिओ गाडी तब्बल ५०० ते ७०० फूट खोल दरीत कोसळल्याने बचावकार्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. अपघाताची माहिती मिळताच महाबळेश्वर पोलीस, स्थानिक प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन पथक, ट्रेकर्स आणि स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्रीच्या अंधारामुळे बचावकार्याला अडथळे येत होते. सोमवारी पहाटेपासून दोरांच्या साहाय्याने दरीत उतरून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू करण्यात आले. या दुर्घटनेत महेश अनिल पवार (वय २५), आदित्य अशोक साळुंखे (वय २१), रितेश राजेंद्र लोखंडे (वय २५), सुहास जितेंद्र लोखंडे (वय २०), अंश समीर चव्हाण (वय १८), उत्कर्ष आनंद शिंगटे (वय २१), अनिल अभिमन्यू शिंगटे (वय २५), नितीन किसन नायकोंडे (वय ३५, सर्व मूळचे आसगाव, ता. कोरेगाव, जि. सातारा) यांचा मृत्यू झाला. हे सर्व सांगाव येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हे सर्वजण पर्यटनासाठी कोकण किंवा महाबळेश्वर परिसरात गेले असावेत, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आंबेनळी घाट हा राज्यातील अतिधोकादायक घाटरस्त्यांपैकी एक मानला जातो. अरुंद रस्ता, तीव्र वळणे आणि खोल दऱ्या यामुळे येथे वारंवार भीषण अपघात घडत असतात. या दुर्घटनेनंतर घाटातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महाबळेश्वर पोलिसांकडून अपघाताचा अधिक तपास सुरू असून, वाहनाचा वेग, चालकाचे नियंत्रण सुटणे आणि घाटातील धोकादायक वळण याबाबत चौकशी केली जात आहे. मृत्यूच्या दरीत कोसळली स्कॉर्पिओ महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटातील एका तीव्र वळणावर स्कॉर्पिओ गाडी अचानक दरीत कोसळली. अपघात इतका भीषण होता की वाहनाचा चक्काचूर झाला असून बचाव पथकांना मृतदेह बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. रात्री उशिरापर्यंत सुरूवातीला शोध कार्यामध्ये दोन मृतदेह हाती लागली आहेत. बचाव कार्य सुरू असून त्यामध्ये रात्रीचा अंधार तसेच सकाळी दाट धुके याचा अडथळा येत होता. आसगाव गावावर शोककळा एकाच गावातील आठ तरुणांचा मृत्यू झाल्याने आसगाव गावात हळहळ व्यक्त होत आहे. गावात शोकसागर पसरला असून नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हेही वाचा: Jana Nayagan Release Date: ‘जन नायकन’ची नवी रिलीज डेट चर्चेत; विजयच्या अखेरच्या चित्रपटाबाबत मोठी अपडेट