Khalapur News : नामांकित कंपनीवर पाणी चोरीचा आरोप; नदीचे पात्र अरुंद केल्याने उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट
Khalapur News : दहा-वीस नव्हे तर १०१ एकरचा महाप्रकल्प वादाच्या भोवऱ्यात; पाणी चोरी आणि नदी प्रदूषणावरून माणकिवली ग्रामपंचायत आक्रमक.

Khalapur News – नावंढे ग्रामपंचायत हद्दीत उभारण्यात येत असलेल्या गोदरेज वूड कंपनीच्या कामकाजावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आंजरूण येथील बंधाऱ्यातील पाणी दिवसाढवळ्या वापरल्याचा आरोप कंपनीवर करण्यात येत असून, माणकिवली ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
या प्रकारामुळे परिसरात पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. नावंढे गावाजवळ कंपनीने सुमारे १०१ एकर जागा खरेदी केली असून येथे प्लाँटींग प्रकल्पांतर्गत बांधकामाचे काम सुरू आहे. मोठ्या प्रमाणावर जेसीबी, पोकलेन आणि डंपरच्या सहाय्याने जागेचे सपाटीकरण करण्यात येत आहे.
मात्र कंपनीच्या कामकाजामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.या प्रकारामुळे बंधाऱ्यातील पाणी लवकर आटण्याची शक्यता असून भविष्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.
या संपूर्ण प्रकारामुळे मोठ्या नावाजलेल्या कंपनीकडून अशा प्रकारचा कारभार होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. एवढ्या मोठ्या कंपनीने पाणी वापराबाबत नियमांचे पालन करणे अपेक्षित असताना अशा प्रकारचे प्रकार समोर येत असल्याने अन्य उद्योगांबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
“नदीपात्रामध्ये कंपनीने माती भराव करून नदीपात्र अरुंद केले आहे. ही कंपनी नावंढे ग्रामपंचायत हद्दीत असल्याने कंपनीचे बांधकाम सुरु आहे. पावसाळ्यामध्ये पूर परिस्थिती उद्भवत असते. पाणी योजनेचे सर्व स्त्रोत या नदीपात्रात आहेत. परंतू नदी पात्राचे पाणी कंपनी चोरून बांधकामासाठी वापरत आहे.”
– बालकृष्ण वाघमारे, सरपंच, माणकिवली ग्रामपंचायत





