प्रभात वृत्तसेवा खालापूर – चिलठण गावच्या वनक्षेत्रात वन विभागाने मध्यरात्री धडक कारवाई करत मौल्यवान खैर झाडांची तस्करी रोखली. या कारवाईत मारुती सुझुकी इको वाहन, पेट्रोल कटर मशिन, मोबाईल फोनसह सुमारे रु. १० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.वन विभागाला मिळालेल्या माहितीनुसार चिलठण येथील राखीव वनात काही व्यक्ती पेट्रोल कटर मशिनच्या सहाय्याने खैर प्रजातीची झाडे तोडून ओंडके तयार करत होते. त्यानुसार शुक्रवारी (दि. ३) पहाटे वन अधिकारी आणि कर्मचारी यांनी गुप्तपणे दबा धरून कारवाई केली. त्यावेळी आरोपी लाकडाचे ओंडके मारुती सुझुकी इको (एमएच ४६ सीएम ५१९१) या वाहनात भरत असताना त्यांना पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र आरोपी अंधाराचा फायदा घेत फरार झाले.घटनास्थळावरून खैरचे ४० ओंडके, लोखंडी रॉड, लाकडी दांडके, मसाला मिरची पूड, तसेच सॅमसंग अँड्रॉइड मोबाईल आणि मोटोरोला कीपॅड मोबाईल असा एकूण रु. १० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई खालापूर वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चिलठण तपास अधिकारी संजय पगारे, वनपाल भगवान दळवी, नितीन कांबळे, पांडुरंग गायकवाड तसेच वनरक्षक अंकुश केंद्रे, सागर टोकरेकोळी, प्रथमेश देवरे, कैलास कांबळे यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास उपवनसंरक्षक राहुल पाटील आणि सहायक वनसंरक्षक सागर माळी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.