Kewal Singh Dhillon : आप सरकारमुळे पंजाब कर्जाच्या खाईत; भाजप प्रदेशाध्यक्ष केवल सिंग धिल्लन यांचा गंभीर आरोप
पंजाबमधील भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील आप सरकारने सातत्याने कर्ज काढून राज्याला गंभीर आर्थिक संकटात ढकलले आहे, असा आरोप पंजाब भाजपचे प्रदेशाध्यक्ष केवल सिंग धिल्लन (Kewal Singh Dhillon) यांनी रविवारी केला.

Kewal Singh Dhillon : पंजाबमधील भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील आप सरकारने सातत्याने कर्ज काढून राज्याला गंभीर आर्थिक संकटात ढकलले आहे, असा आरोप पंजाब भाजपचे प्रदेशाध्यक्ष केवल सिंग धिल्लन (Kewal Singh Dhillon) यांनी रविवारी केला. पंजाब सरकारच्या वित्त विभागाने १० जुलै रोजी बाँड्सच्या माध्यमातून पुन्हा एकदा १,००० कोटी रुपयांचे कर्ज उभारण्याची अधिसूचना जारी केल्यानंतर भाजपने हा हल्लाबोल केला आहे.
धिल्लन (Kewal Singh Dhillon) यांनी सरकारच्या आर्थिक दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पंजाबचे अर्थमंत्री हरपाल सिंग चीमा हे नेहमी जीएसटी, व्हॅट आणि अबकारी कर संकलनात मोठी वाढ झाल्याचा दावा करतात. मात्र, दुसरीकडे सरकारला वारंवार बाजारातून कर्ज घ्यावे लागत आहे, हेच राज्यावरील आर्थिक ताणाचे लक्षण आहे.
धिल्लन (Kewal Singh Dhillon) यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, आप सरकारने २०२२-२३ मध्ये सुमारे २४,००० कोटी, २०२३-२४ मध्ये २८,००० कोटी आणि २०२४-२५ मध्ये ३४,२०१ कोटी रुपयांचे कर्ज घेतले. चालू आर्थिक वर्षातही (२०२५-२६) जानेवारीपर्यंत नियोजित ४९,९०० कोटींपैकी २०,७७० कोटींपेक्षा जास्त कर्ज आधीच घेण्यात आले असून, आता त्यात आणखी १,००० कोटींची भर पडली आहे.
भाजप प्रदेशाध्यक्षांनी चिंता व्यक्त केली की, या कर्जामुळे पंजाबच्या भविष्यातील पिढ्यांवर मोठा बोजा पडत आहे. वर्ष २०२२ मध्ये पंजाबवर सुमारे २.८२ लाख कोटी रुपयांचे कर्ज होते, ते आता वाढून सुमारे ४.१७ लाख कोटी रुपये झाले आहे. चालू गतीने हे कर्ज २०२६-२७ पर्यंत ४.४८ लाख कोटी रुपयांवर पोहोचण्याची भीती आहे.
जर गेल्या चार वर्षांत राज्याचा महसूल सातत्याने वाढत आहे, तर सरकारला नवीन कर्ज घेण्याची गरज का पडत आहे? असा सवाल धिल्लन (Kewal Singh Dhillon) यांनी केला. तसेच, मुख्यमंत्र्यांनी आणि अर्थमंत्र्यांनी केवळ कर्ज घेण्यावर अवलंबून न राहता राज्याची खरी आर्थिक स्थिती जनतेसमोर मांडावी आणि कर्ज कमी करण्यासाठी एक विश्वासार्ह रोडमॅप सादर करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.






