Ketan Agrawal Murder: हुडी घातलेला ‘तो’ व्यक्ती चेतनच? मुख्य आरोपी चेतनला घेऊन पोलिसांनी नेमकं काय केलं?
Ketan Agrawal Murder: केतन अग्रवाल खून प्रकरणातील मुख्य आरोपी चेतन चौधरीची लोहगडावर 'गेट ॲनालिसीस' चाचणी पूर्ण; पोलिसांकडून घटनाक्रमाचे व्हिडीओ शूटिंग.

Ketan Agrawal Murder – केतन अग्रवाल खूनप्रकरणातील मुख्य आरोपी चेतन चौधरीची पुणे ग्रामीण पोलिसांनी बुधवारी सकाळी ॲनालिसीस (चालण्याच्या पद्धतीचे विश्लेषण) चाचणी लोहगडावर पूर्ण केली. मुसळधार पावसात कडेकोट पोलीस बंदोबस्तात चेतनला घटनास्थळी नेऊन संपूर्ण घटनाक्रमाचे सीन रिक्रिएशन केले. यातून तपासाला वैज्ञानिक पुरावा मिळण्याची अपेक्षा आहे.
तपासात पोलिसांनी केतनच्या वजनाएवढ्या डमीचा वापर करून हत्येचा घटनाक्रम पुन्हा उभा केला. आरोपीने कोणत्या मार्गाने हालचाल केली, केतनला कशा प्रकारे दरीत ढकलले याचा घटनाक्रम पोलिसांनी प्रत्यक्षात पडताळला. या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरण केले आहे. यावेळी चेतनला सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या हुडीधारी व्यक्तीप्रमाणे चालण्यास सांगितले.
त्याच्या चालण्याची शैली, शरीराची हालचाल, पावलांची लांबी आणि तोल यांचे न्यायवैद्यक तज्ज्ञांच्या मदतीने विश्लेषण होईल. हा अहवाल सीसीटीव्हीतील व्यक्ती आणि चेतनची ओळख वैज्ञानिक पद्धतीने पडताळण्यासाठी महत्त्वाचा ठरेल.यापूर्वी सहआरोपी सिया गोयल हिच्याकडूनही घटनास्थळी सीन रिक्रिएशन केले होते. आता दोन्ही आरोपींचे जबाब, न्यायवैद्यक अहवाल, सीसीटीव्ही फुटेज आणि घटनास्थळावरील पुराव्याचा परस्पर ताळमेळ घालून तपास अंतिम टप्प्यात नेण्याचा प्रयत्न आहे.
दरम्यान, सिया गोयल हिचा भाऊ साहिल गोयल याला ॲड. आशुतोष श्रीवास्तव यांनी १० कोटी रुपयांची मानहानीची कायदेशीर नोटीस बजावली आहे. माध्यमांसमोर केलेल्या कथित बदनामीकारक वक्तव्यांमुळे व्यावसायिक प्रतिमेला धक्का बसल्याचा दावा करत ४८ तासांत बिनशर्त जाहीर माफी आणि सात दिवसांत नुकसानभरपाई देण्याची मागणी नोटिशीत केली आहे.
२७ गुण जुळले तरी…
तपासात केतन आणि सियाचा यांचा विवाह दोन्ही कुटुंबांच्या संमतीने ठरल्याचे समोर आले. कुंडलीतील २७ गुण जुळल्यानंतर विवाह निश्चित झाला. मात्र, सियाला हा विवाह मान्य नसून चेतनशी तिचे प्रेमसंबंध असल्याने दोघांनी मिळून केतनच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
लोहगड खुलाच
केतन अग्रवाल खून प्रकरणानंतर लोहगड किल्ल्यावर पर्यटकांची गर्दी वाढली असून, किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्यात आल्याची अफवा पसरली होती. मात्र, ही माहिती चुकीची असल्याचे स्पष्ट करत उपविभागीय अधिकारी गजानन टोम्पे यांनी किल्ला पर्यटकांसाठी पूर्वीप्रमाणेच खुला असल्याचे सांगितले






