Ketan Agarwal Murder: सियाच्या आई-वडिलांची ५ तास, भावाची १० तास चौकशी; केतन मर्डर केसमध्ये संपूर्ण कुटुंब अडचणीत?
Ketan Agarwal Murder: पोलीस कोठडीची मुदत संपण्यापूर्वी आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरीला घेऊन लोहगडावर सीन रिक्रिएशन.

Ketan Agarwal Murder – केतन अगरवालची हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना रविवारी सकाळी लोहगडावर नेऊन चौकशी करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाची पुनर्रचना (सीन रिक्रएशन) करण्यात आली. सियाचे आई, वडिल, भावाचीही पोलिसांकडून शनिवारी-रविवारी कसून चौकशी करण्यात आली. या हत्या प्रकरणात सिया आणि चेतनने समाज माध्यमांवर माहिती शोधून हत्येचा कट रचल्याचे पोलीस तपासात उघड झाले.
सिया केतनला घेऊन १४ जूनला लोहगडावर गेली असताना, तिने केतनला दरीत ढकलून देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, हा प्रयत्न यशस्वी झाला नाही. आपण एकट्याच्या बळावर हे काम करू शकत नसल्याची जाणीव झाल्यावर तिने चेतनची मदत घेतल्याची माहिती तपासात मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले. आरोपी चेतन आणि सिया वडगाव मावळ न्यायालयाच्या आदेशानुसार सध्या पोलीस कोठडीत आहेत. दोघांना सोमवारपर्यंत (२९ जून) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
रविवारी सकाळी सिया आणि चेतनला घेऊन पोलिसांचे पथक लोहगडावर गेले. घटनास्थळाची पाहणी पोलिसांनी केली. दोघांची घटनास्थळी चौकशी करण्यात आली. घटना नेमकी कशी घडली, तसेच घटनाक्रमाची माहिती पोलिसांनी घेतली. सिया आणि चेतनने १८ जून रोजी लोहगड किल्ल्यावरून केतनला दरीत ढकलून दिले. यात केतनचा मृत्यू झाला. याप्रकरणी अगरवाल कुटुंबीयांनी संशय व्यक्त केल्यानंतर पाेलिसांनी या खुनाचा छडा लावला. पोलिसांना या प्रकरणाचा संशय येऊ नये याची दोघांनीही पुरेपूर काळजी घेतली होती.
आई-वडिलांची ५ तास चौकशी
सियाच्या भावाची लोणावळा ग्रामीण पोलिसांनी शुक्रवारी तब्बल दहा तास चौकशी केली होती. त्यानंतर शनिवारी सिया गोयलच्या आई-वडिलांचीही पाच तासांहून अधिक काळ कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान पोलिसांनी त्यांच्यासमोर अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले. तपासाच्या अनुषंगाने सिया, तिचा प्रियकर चेतन चौधरी आणि कुटुंबीयांना या कटाची पूर्वकल्पना होती का, तसेच खूनाच्या कटाशी संबंधित इतर बाबींबाबत माहिती घेण्यात आल्याचे समजते. पोलिस या प्रकरणातील प्रत्येक दुव्याची बारकाईने पडताळणी करत आहेत.






