UK: केमी बडेनोच यांनी रचला इतिहास; मोठ्या ब्रिटिश राजकीय पक्षाचे नेतृत्व कृष्णवर्णीय महिलेकडे

लंडन – ब्रिटनमध्ये 14 वर्षे सत्तेत राहिल्यानंतर व निवडणुकीत दारूण पराभव पत्करावा लागल्यानंतर कंझर्व्हेटिव्ह पक्ष स्वतःची पुनर्रचना करण्याचा प्रयत्न करत आहे. याची सुरुवात नेतृत्व बदलाने झाली आहे. शनिवारी, कंझर्व्हेटिव्ह पक्षाने केमी बेडेनोच यांची नवीन नेता म्हणून निवड केली. बेडेनॉच यांनी मध्यवर्ती उजव्या पक्षाच्या सुमारे 100,000 सदस्यांनी केलेल्या मतदानात प्रतिस्पर्धी खासदार रॉबर्ट जेनरिक यांचा पराभव केला. मोठ्या ब्रिटिश राजकीय पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या बेडेनॉच या पहिल्या कृष्णवर्णीय महिला आहे.
बेडेनोच यांनी आता माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांची जागा घेतली आहे. सुनक यांच्या नेतृत्वाखाली कंझर्व्हेटिव्ह पक्षाचा जुलैमध्ये दारूण पराभव झाला होता. कंझर्व्हेटिव्ह पक्षाने 200 पेक्षा जास्त जागा गमावल्या आणि केवळ १२१ जागा राखण्यात त्यांना यश आले. 1832 नंतर पक्षाचा हा सर्वात वाईट पराभव होता.
अनेक वर्षांचे विभाजन, घोटाळे आणि आर्थिक गोंधळानंतर पक्षाची प्रतिष्ठा पुनर्संचयित करण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. अर्थव्यवस्था आणि इमिग्रेशन या प्रमुख मुद्द्यांवर पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्या धोरणांमधील त्रुटी उघड करणे आणि पक्षाला २०२९ च्या निवडणुकीत पुन्हा सत्तेवर आणण्याचे कंझर्व्हेटीव्हच्या नव्या नेत्यासमोर आव्हान आहे.
याआधी बुधवारी ऋषी सुनक यांनी ब्रिटिश संसदेत विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी दिवाळीच्या सणाच्या काही आठवणी सांगितल्या आणि सांगितले की, दोन वर्षांपूर्वी दीपोत्सवाच्या वेळी त्यांना भारतीय वंशाचे पहिले पंतप्रधान म्हणून नियुक्त करण्यात आले होते. जुलैमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पराभवानंतर नवीन नेत्याची निवड होईपर्यंत 44 वर्षीय सुनक कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे अंतरिम नेते म्हणून काम करत होते. सुनक म्हणाले, दिवाळीच्या काळात मी माझ्या पक्षाचा नेता झालो आणि या सणाच्या काळात मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे.’





