Keerthy Suresh: फक्त घरच्या जेवणावरही अगदी फिट! अभिनेत्री किर्ती सुरेशचा साधा पण प्रभावी फिटनेस मंत्र

Keerthy Suresh: निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी महागडे डाएट, तासन्तास जिम किंवा आवडत्या पदार्थांचा त्याग करायलाच हवा, असं नाही. अभिनेत्री किर्ती सुरेशचा फिटनेस प्रवास हेच दाखवून देतो. साधं घरचं खाणं, योग्य व्यायाम आणि स्वतःच्या शरीराचं ऐकणं हाच तिच्या फिटनेसचा खरा मंत्र आहे.
किर्ती सुरेशचा फिटनेस प्रवास सुरुवातीपासून परफेक्ट नव्हता. २०१८-१९ च्या सुमारास तिने झपाट्याने वजन कमी केलं. फक्त कार्डिओ व्यायाम करून तिने जवळपास ९ किलो वजन घटवलं. मात्र, यामुळे तिचं वजन तर कमी झालं, पण स्नायूही कमी झाले आणि ती खूपच बारीक दिसू लागली. तेव्हा तिला जाणवलं की फक्त कार्डिओ हा योग्य मार्ग नाही.
एका मुलाखतीत किर्तीने सांगितलं होतं की, लहानपणापासून ती सडपातळ होती आणि फारसा व्यायाम करत नव्हती. अभिनय सुरू झाल्यानंतर काम, झोप आणि खाणं एवढंच तिचं आयुष्य होतं. जास्त कार्डिओमुळे शरीरावर वाईट परिणाम होत असल्याचं लक्षात आल्यानंतर तिने फिटनेसकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला.
फॅन्सी डाएट नाही, घरचं पारंपरिक खाणं
किर्ती सुरेश कधीही ट्रेंडी किंवा फॅन्सी डाएटच्या मागे धावली नाही. तिला घरचं, पारंपरिक दक्षिण भारतीय जेवण आवडतं. वजन कमी करतानाही तिने केटो किंवा इतर कोणताही खास डाएट फॉलो केला नाही. तिचा आहार हाय-प्रोटीन आणि लो-कार्ब असा आहे.
ती दररोज ६ ते ७ अंड्यांचे पांढरे भाग, पनीर, टोफू, सोया आणि डाळी खाते. विशेष म्हणजे ती प्रोटीन शेकही घेत नाही. “जे खाऊ वाटतं ते मी खाते. एखाद्या पदार्थाला घाबरून नकार देणं मला योग्य वाटत नाही,” असं ती म्हणते.
View this post on Instagram
योगा आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगचा आधार
फक्त कार्डिओनंतर तिने योगा आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगकडे वळण्याचा निर्णय घेतला. कोरोनाच्या काळात तिने योगा सुरू केला आणि त्याचा शरीरावर चांगला परिणाम जाणवला. त्यानंतर मागील दोन वर्षांपासून ती नियमित स्ट्रेंथ ट्रेनिंगही करते. यामुळे तिचं शरीर मजबूत झालं आणि फिटनेस टिकून राहिला.
किर्ती सुरेशचा फिटनेस मंत्र
किर्ती सुरेशच्या फिटनेस प्रवासातून एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं. त्यामुळे दुसऱ्यांची नक्कल न करता, आपल्या शरीरासाठी काय योग्य आहे ते समजून घेणं महत्त्वाचं आहे. फिटनेस ही स्पर्धा नसून आयुष्यभराचा प्रवास आहे, आणि तो साध्या, टिकाऊ सवयींनीच यशस्वी होतो.





