KDMC News : “भाजपने आम्हाला अल्टिमेटम देऊ नये!”; केडीएमसीच्या सत्तेवरून भाजप-शिंदे गटात जुंपली
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील (KDMC News) सत्ता समीकरणावरून 'महायुती'मधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

KDMC News : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील (KDMC News) सत्ता समीकरणावरून ‘महायुती‘मधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये जोरदार राजकीय कलगीतुरा रंगला असून, भाजपने केडीएमसीच्या सत्तेतून मनसेला बाहेर काढण्याचा थेट अल्टिमेटम शिंदे गटाला दिला होता. या अल्टिमेटमवर शिंदे गटाने आक्रमक पवित्रा घेत भाजपला जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे.
“भाजपने आम्हाला अल्टिमेटम देऊ नये”
भाजपच्या इशाऱ्याला प्रत्युत्तर देताना शिंदे गटाच्या स्थानिक नेतृत्वाने (KDMC News) थेट सुनावले आहे की, भाजपने आम्हाला कसलाही अल्टिमेटम देण्याचा प्रयत्न करू नये. मनसेबाबतची आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे; मनसे नेते अमित ठाकरे यांनी घेतलेल्या कोणत्याही वादग्रस्त भूमिकेचे आम्ही समर्थन केलेले नाही. शिंदे गटाने मनसेसोबत गट स्थापन केला, तेव्हा भाजप गप्प का बसली होती, असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.
अंबरनाथ, भिवंडीत युतीधर्म कुठे गेला होता?
भाजपच्या ‘युतीधर्मा’च्या दाव्यावर निशाणा साधत शिंदे गटाने (KDMC News) जुन्या राजकीय समीकरणांची आठवण करून दिली. “अंबरनाथ, भिवंडी आणि बदलापूरमध्ये सत्ता स्थापन करताना भाजपला युतीधर्माचा विसर पडला होता का? अंबरनाथ आणि भिवंडीत तर भाजपने थेट काँग्रेससोबत हातमिळवणी केली होती,” असा घणाघाती आरोप शिंदे गटाने केला.
“केवळ सत्तेची मलाई खाण्यासाठी सोबत आलात”
निवडणुकीपूर्वी “आमचाच महापौर बसणार आणि सत्ता येणार” अशा मोठ्या वल्गना भाजपचे नेते करत होते. मात्र, प्रत्यक्षात सत्ता स्थापनेची वेळ आल्यावर केवळ सत्तेची मलाई खाण्यासाठी भाजप शिंदे गटासोबत सत्तेत सामील झाली, असा बोचरा वार शिंदे गटाने केला आहे.
मनसेच्या सत्तेतील सहभागावरून (KDMC News) आता भाजप आणि शिंदे गटामधील संघर्ष अधिक तीव्र झाला असून कल्याण-डोंबिवलीतील या अंतर्गत वादाचे पडसाद ठाणे जिल्ह्यासह राज्य पातळीवरील महायुतीवर उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.






