Sandeep Deshpande : “..तर भिंतीवर सोडा, मी माझ्या कपाळावर इथे नरेंद्र मोदी यांचा फोटो चिकटवून फिरेल”; संदीप देशपांडेंचं भाजपला आव्हान
Sandeep Deshpande : आज या प्रकरणावर पत्रकार परिषद घेत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी भाजपला थेट आव्हान दिले आहे.

Sandeep Deshpande : मनसे नेते अमित ठाकरे पुणे दौऱ्यावर आले असताना शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राचार्यांच्या कक्षात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटो शेजारीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आला होता. हा फोटो मनसे नेते अमित ठाकरे यांनी काढायला लावला. त्यानंतर यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. आज या प्रकरणावर पत्रकार परिषद घेत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी भाजपला थेट आव्हान दिले आहे.
भिंतीवर सोडा मी माझ्या कपाळावर इथे नरेंद्र मोदी यांचा फोटो चिकटवून फिरेल, असे आव्हान संदीप देशपांडे यांनी भाजपला दिले आहे. लोकांची कामचं होत नाही, उलट याचा पक्ष फोड, त्याचा पक्ष फोड हे सुरू आहे. याच्यापेक्षा रस्ते चांगले करा. खड्डेमुक्त रस्ते करा, असे म्हणत त्यांनी भाजपवर टीकास्त्र डागले.
…तर भिंतीवर सोडा मी माझ्या कपाळावर इथे नरेंद्र मोदी यांचा फोटो चिकटवून फिरेल : संदीप देशपांडे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्यानंतर निर्माण झालेल्या वादावर बोलताना संदीप देशपांडे म्हणाले, “भाजपने महाराष्ट्रातील सगळ्या शाळा चांगल्या कराव्यात. सगळीकडे शिक्षक भरती व्हावी. लोकांच्या समस्या सोडवाव्यात. २०१४ मध्ये आम्हाला जे आश्वासन दिलं होतं, आमच्या प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख येतील. ते त्यांनी द्यावे. २ कोटी रोजगार तरुणांना देण्यात येणार होते. ते त्यांनी द्यावेत. जगातील सर्वात सशक्त अर्थव्यवस्था करणार होतात. ती त्यांनी करावी. विकसनशील भारताला विकसीत भारताला नेणार होतात. ते करावं. त्यांनी या गोष्टी जर केल्या. तर भिंतीवर सोडा मी माझ्या कपाळावर इथे नरेंद्र मोदी यांचा फोटो चिकटवून फिरेल.”
नेमकं काय घडलं?
अमित ठाकरे हे पुण्यातील सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात येणार्या सुविधांची पाहणी करण्यासाठी पुणे दौऱ्यावर आले होते. प्राचार्याच्या कक्षात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटो शेजारीच पंतप्रधान मोदी यांचा फोटो लावण्यात आला होता. मनसे नेते अमित ठाकरे यांनी हा फोटो काढण्यास सांगितले. त्यानंतर दोन कार्यकर्त्यांनी हा फोटो काढला. यानंतर मोठा वाद निर्माण झाला. दोन्ही पक्षांचे कार्यकर्त्ये आमने सामने आले. पोलिसांकडून धरपकड करण्यात आली. यामुळे मोठा तणाव होऊन वाद आणखी चिघळला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस चौकीत दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कृष्णराज महाडिक यांचा आरोप
भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी गंभीर केला होता. आम्ही तिथे शांतपणे आंदोलन करण्यासाठी गेलो होतो परंतु तिथे मनसेच्या गुंडांनी आमच्या मुलांना मारले आहे. काचेची बॉटल फेकून त्यांना इजा व्हावी आणि हिंसक गोष्टी घडाव्यात या विचाराने ते तिथे जमले होते. या आरोपानंतर फोटोवरुन निर्माण झालेला वाद आणखी चिघळला. आता या संपूर्ण प्रकरणावर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भाजप युवा मोर्चाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली असून खडेबोल सुनावले आहेत.
रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केली नाराजी
‘काल आलेला पोरगा काही तरी बोलतो आणि आपण त्या विरोधात आंदोलन करतो हे चुकीचे आहे’ असे रवींद्र चव्हाण म्हणाले. अमित ठाकरेंच्या विरोधात भाजपने केलेल्या आंदोलनावर रवींद्र चव्हाणांनी नाराजी व्यक्त केली. “मला युवशक्तीला अडचणीत आणायचे नाही, आम्हाला युवकांना शिक्षित करायचे आहे. गुंड म्हणून तयार करायचे नाही” असे मुबंई कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना रवींद्र चव्हाण यांनी युवा मोर्चाला सुनावलं आहे.
Taapsee Pannu: तापसी पन्नूला गंभीर भूमिकेत पाहून मित्र का होतात चकित? अभिनेत्रीनेच सांगितलं कारण






