परभणी : परभणी जिल्ह्यातील एसीबीकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. परभणीच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांच्यासह क्रीडा अधिकारी नानकसिंग बस्सी (रा. नांदेड) हे एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. बिल काढण्यासाठी अडीच लाख रुपयांची मागणी करीत दीड लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. २७) दुपारी करण्यातली असून नवा मोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Kavita Navande) विशेष म्हणजे पैसे मागत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विधानसभेतही चर्चा झाली आणि त्या पकडल्या गेल्या. आपल्या कार्यपद्धतीने वादग्रस्त ठरलेल्या नावंदे यांच्या कार्यपद्धतीवर शिवसेना ठाकरे गटाचे आ. डॉ. राहुल पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. राजेश विटेकर यांनी विधानसभेत बुधवारीच राज्य सरकारकडे विचारणा करीत आरोपांबाबत चौकशी करण्याची मागणी केली होती. नेमकं प्रकरण काय? २०२४ मध्ये एका क्रीडा अकॅडमीने क्रीडा स्पर्धा घेतल्या होत्या. त्यासाठीचे पाच लाख रुपये व त्या संस्थेच्या जागेवर करण्यात आलेल्या स्विमिंग पुलाचे काम ९० टक्के पूर्ण झाल्याने संबंधित संस्थेने पुलाचे ९० लाख रुपयांचे व स्पर्धेचे ५ लाखांचे बिल जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे दाखल केले होते. बिले मंजूरीसाठी संबंधित संस्थेच्या पदाधिकाऱ्याने ३ मार्च रोजी नावंदे व क्रीडा अधिकारी नानकसिंग बस्सी यांची भेट घेऊन बिलाची मागणी केल्यानंतर नावंदे यांनी स्वतःसाठी २ लाख व बस्सी यांच्यासाठी ५० हजार अशा एकूण २ लाख ५० हजाराची मागणी केली. त्यावर बिलामध्ये जाणीवपूर्वक त्रुटी काढल्या जातील. या कारणाने १३ मार्च रोजी संबंधिताने नावंदे यांना १ लाख रुपये दिले. उर्वरित दीड लाख देण्याची इच्छा नसल्याने संबंधिताने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार दिली. पडताळणीदरम्यान नावंदे यांनी उर्वरित रक्कम स्वीकारण्यास सहमती दर्शविली. त्यामुळे लाचलुचपतने गुरुवारी सापळा रचला असता क्रीडा अधिकारी नानकसिंग बस्सी यांनी दीड लाख रुपयांची मागणी करीत ती रक्कम घेण्याची तयारी दर्शवत नावंदे यांच्या दालनात घेऊन गेले. तेथे या दोघांनीही लाचेची रक्कम स्वीकारताच पथकाने त्यांना ताब्यात घेतले. कविता नावंदे यांची कारकीर्दच वादग्रस्त कविता नावंदे यांची कारकीर्दच वादग्रस्त ठरलेली आहे. अहिल्यानगर व संभाजीनगर येथे प्रत्येकी एक वेळा त्या निलंबित झाल्या होत्या. तीन वेळा त्यांची विभागीय चौकशीही झालेली आहे. परभणी येथील कारकीर्दीतही अनेक कार्यालयीन प्रकरणांत त्या वादग्रस्त ठरल्या होत्या. आठ दिवसांपूर्वीच पैसे मागणीचा एक व्हिडिओ त्यांच्या विरोधात व्हायरल झालेला असताना त्या बिनधास्तपणे आपल्या शैलीने काम करीत होत्या. त्यामुळे आ. पाटील व आ. विटेकर यांनी या व्हिडिओच्या व तक्रारींच्या आधारे त्यांच्या चौकशीची मागणी बुधवारीच सभागृहात केली होती. एसीबीने छापा टाकताच नावंदे यांची पर्सची तपासणी केली असता त्यामध्ये लाचेचे एक लाख रुपये व व्यतिरिक्त ६ हजार रुपये तसेच एक मोबाईल आढळला. बस्सी यांच्याकडेही लाचेच्या रकमेसह १ हजार ८३० रुपये व मोबाईल सापडला. त्यानंतर पथकाने नावंदे यांच्या निवासस्थानाची झडती घेतली असता त्यामध्ये १ लाख ५ हजार रुपयांची रोख रक्कम हाती घेण्यात आली. तसेच क्रीडा अधिकारी बस्सी यांच्या नांदेड येथील घराचीही झडती घेण्यात आली.