कौस्तुभ गणबोटे, संतोष जगदाळे यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार; अनेकांनी वाहिली श्रद्धांजली

Pahalgam Terrorist Attack | जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे मंगळवारी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यामध्ये २७ पर्यटकांचा मृत्यू झाला. पहलगाममधील बेसरन परिसरात हजारोंच्या संख्येने असलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. पोलिसांच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी नाव आणि धर्म विचारत पर्यटकांची हत्या करण्यास सुरुवात केली.
या हल्यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला असून यामध्ये पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा समावेश आहे. त्यांचे मृतदेह गुरुवारी सकाळी पुणे विमानतळावर आणण्यात आले. त्यानंतर संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचे मृतदेह त्यांच्या घरी नेण्यात आले. यावेळी त्यांना अंतिम निरोप देण्यासाठी पुण्यातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.
दरम्यान, कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांच्यावर आज भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली असून, अनेक सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक नागरिक व नातेवाईकांनी अंत्यविधीसाठी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली. दोघेही विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत असत आणि त्यांचे योगदान कायम लक्षात ठेवले जाईल, असे प्रतिपादन या वेळी अनेकांनी केले.
शरद पवारांनी गणबोटे आणि जगदाळे यांच्या पार्थिवाचे घेतले दर्शन
शरद पवार यांनी संतोष जगदाळेंच्या पार्थिवाचे दर्शन घेत त्यांच्या कुटुंबियांंचं सांत्वन देखील त्यांनी केलं. यावेळी संतोष जगदाळेंच्या पत्नीने हल्ल्यादरम्यान नेमकं काय घडलं? याची माहिती दिली आहे. ‘माझा नवरा माझ्यासोबत नाही. आमच्यासोबत असलेला माणूस डोळ्यांदेखत गेला. माझी मुलगी आम्ही काय करायचं आता… अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली, त्या कुटुंबांनी काय करायचं आता, असं म्हणत संतोष जगदाळेंच्या पत्नीला अश्रू अनावर झाले.





