Pahalgam attack Pune Tourists : संतोष जगदाळे, कौस्तुभ गणबोटे यांचे पार्थिव पुण्यात दाखल; मृतदेह पाहून कुटुंबाने फोडला हंबरडा

Pahalgam Terrorist Attack | जम्मू काश्मीरमधील लोकप्रिय पर्यटन स्थळ असलेल्य पहलगाम येथे मंगळवारी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यामध्ये २७ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. पहलगाममधील बेसरन परिसरात हजारोंच्या संख्येने असलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. पोलिसांच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी नाव आणि धर्म विचारत पर्यटकांची हत्या करण्यास सुरुवात केली.
या हल्यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला असून यामध्ये पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा समावेश आहे. त्यांचे मृतदेह गुरुवारी सकाळी पुणे विमानतळावर आणण्यात आले आहेत. यानंतर संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचे मृतदेह त्यांच्या घरी नेण्यात आले. यावेळी त्यांना अंतिम निरोप देण्यासाठी पुण्यातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.
संतोष जगदाळे हे त्यांच्या 86 वर्षांच्या वृ्द्ध आईला काश्मीरला जाण्यापूर्वी भेटले होते. काश्मीरला फिरायला जातोय, लवकरच परत येईन, असं त्यांनी आईला सांगितलं होतं. मात्र, काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी त्यांना गोळ्या घालून ठार केल्याने जगदाळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
संतोष जगदाळे यांचा मृतदेह त्यांच्या घरी आणण्यात आला तेव्हा त्यांच्या पत्नीला अश्रू अनावर झाले. संतोष जगदाळे यांची पत्नी धाय मोकलून रडत होती. कौस्तुभ गणबोटे यांच्या निवासस्थानीही त्यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचलेल्यांना अश्रू अनावर झाले आहेत. कौस्तुभ गणबोटे यांच्या कुटुंबीयांचा फसरणाचा व्यवसाय होता. त्यामुळे हे कुटुंब या परिसरात प्रसिद्ध आहे.
पुणे एअरपोर्टवर गुरुवारी पहाटे गणबोटे आणि जगदाळे यांचे पार्थिव नेण्यासाठी रुग्णवाहिका दाखल झाल्या होत्या. यावेळी मंत्री माधुरी मिसाळ आणि मंत्री दत्तात्रय भरणे हे उपस्थित होते. दोन्ही कुटुंबांचे नातेवाईक एअरपोर्टवर आले होते. कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे हे दोघेही गेल्या अनेक वर्षांपासून मित्र होते. त्यामुळे हे दोन्ही कुटुंबीय एकत्रच काश्मीर फिरायला गेले होते. मात्र, या दोन्ही कुटुंबातील पुरुषांना दहशतवादी हल्ल्यात जीव गमावावा लागला आहे. त्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.





