Katraj Tunnel Accident – मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सिमेंटची वाहतूक करणाऱ्या बल्करने दिलेल्या धडकेत दोघे जखमी झाले असून, तीन वाहनांचे नुकसान झाले आहे. हा अपघात गुरुवारी (दि. ५) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास नवीन कात्रज बोगद्याच्या पुढे असलेल्या पेट्रोलपंपानजीक घडला आहे. अपघातात कारमधील चालक चरणदास लक्ष्मण आकटे (६४, रा. हरपुडे देवरुख, रत्नागिरी), सिमेंट बल्कर चालक आदृश्यप्पा गुरू सिद्दप्पा मस्तीहोली (३५, रा. बेलगम कर्नाटक) जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी आंबेगाव पोलिसांत रात्री उशिरापर्यंत सिमेंट बल्कर चालकावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. आंबेगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी सांगितले, की बल्कर ट्रकने दुपारी साडेबाराच्या सुमारास पुणे बंगळुरू महामार्गावर दोन वाहनांना पाठीमागून धडक दिली. हा बल्कर साताऱ्याकडून मुंबईकडे निघाला होता. कात्रज बोगद्याच्या पुढे उतारावर येथील एका पेट्रोलपंपासमोर त्याने वाहनांना पाठीमागून धडक दिली. त्यानंतर तो दरी पुलावर थांबला. अपघातात कारमधील चालक अडकून पडला होता. घटनेची माहिती मिळताच आंबेगाव पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत कारचालकाला बाहेर काढून नजीकच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या वेळी बल्करचा चालकही जखमी झाला असून, त्याला रुग्णालयात दाखल केले आहे. अपघातामुळे काही वेळ महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. तरीही अपघात थांबेनात मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर दरी पूल, कात्रज बोगद्याजवळील उतार, नवले पूल, नऱ्हे परिसरात झालेल्या अपघातांत अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. कात्रज बोगदा परिसरातील उतारावर यापूर्वीही अनेक अपघात झाले आहेत. त्यासाठी प्रशासनाने स्पीडगन, रम्बलर अशा उपायोजना केल्या आहेत. तरीदेखील उतारावर अपघात होताना दिसून येत आहेत.