कात्रज परिसर ग्रीन नव्हे…रेड झोन

कात्रज (प्रतिनिधी) – कात्रज परिसरातील सुंधा माता मंदिर अंजनी नगर येथील तीन व्यक्ती करोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने गेल्या दोन महिन्यांपासूस ग्रीन झोन मध्ये सुरक्षित असणारा कात्रज परिसरही बाधित झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
कात्रज परिसरातील अंजनी नगर भागामध्ये सुंधा माता मंदिराजवळ एका कुटुंबामध्ये एकूण नऊ व्यक्ती राहतात. त्यातील एका युवकाला त्रास होऊ लागल्याने भारती हॉस्पिटल येथे त्याची तपासणी करण्यात आली असता त्याला करोना झाल्याचे आढळून आले. त्यामुळे कुटुंबातील सर्वांची तपासणी करण्यात आली. यामध्ये दोघे नवरा-बायको पॉझिटिव्ह आढळून आले.
हे तीनही जण 30 वयोगटाच्या आतील आहेत. दोन रुग्णांना भारती विद्यापीठ हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले असून एकाला सिंहगड रोड येथील पुणे महानगरपालिकेचे कै. मुरलीधर पांडुरंग लायगुडे हॉस्पिटल येथे दाखल केले आहे. याच कुटुंबातील सर्वांची चाचणी करण्यात आली त्यामध्ये इतर सहा व्यक्ती निगेटिव्ह असल्याचे आढळून आले असून त्यांना आरोग्य निरीक्षकांमार्फत पुढील पंधरा दिवस होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.
रुग्ण आढळून आल्याने आजूबाजूचा परिसर सोडियम हैपो क्लोराईड स्प्रे करून सीलबंद करण्यात आला आहे. आरोग्य निरीक्षक यांच्या माहितीनुसार गंजपेठ, महात्मा फुले वाडा शेजारील तिघेजण हे गेल्या पंधरा दिवसांपूर्वीच येथे दोन दिवस राहायला आले होते. या तिघांमधील एक वयस्कर व्यक्ती करोना पॉझिटिव्ह आढळला आहे. कात्रज परिसरामध्ये दुसऱ्या भागातून वास्तव्यास आलेल्या या व्यक्ती मुळेच या कुटुंबातील सदस्यांना करोना विषाणूंची लागण झाल्याचे समजते.
कात्रज परिसरामध्ये एकही रुग्ण सापडला नसल्याने हा परिसर ग्रीन झोनमध्ये येत होता. मात्र, आता तीन पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने झोनमध्ये बदल होणार आहे. या बाधितांचा अन्य कोणाशी संबंध आला आहे का, याची चौकशी धनकवडी, सहकार नगर क्षेत्रीय कार्यालयात अंतर्गत आरोग्य निरीक्षकांमार्फत सुरू असून संतोष नगर, अंजली नगर, शनी नगर, दत्तनगर असे भाग आहेत. या भागांमध्ये पूर्णपणे भाग सील करण्यात येणार आहेत.





