Pune : कातकरी बांधवांना जांभूळ-आंबा विक्रीतून मिळतोय रोजगार; दिड महिन्यात तब्बल ‘इतक्या’ लाखांची उलाढाल

पुणे: शनिवार रविवारसह इतर दिवशी मोठ्या संख्येने पर्यटक येत आहेत. त्यामुळे सिंहगड पानशेतच्या डोंगर दऱ्याखोऱ्यातील आदिवासी कातकरी बांधवांना जांभूळ आंबा विक्रीतून चांगला रोजगार मिळत आहे. गेल्या दिड महिन्यात जांभूळ आंबा तसेच रानभाज्या, रानफळे विक्रीतून आदिवासी कातकरी बांधवांनी तब्बल पंचवीस लाखांची उलाढाल केली आहे.
पुणे-पानशेत रस्त्यावरील डोणजे, खानापूर, वरदाडे, निगडे मोसे, ओसाडे, सोनापुर, मालखेड, पानशेत आदी ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला आदिवासी कातकरी समाजाच्या महिला, युवकांनी जांभूळ आंबा व इतर रानमेव्याच्या विक्रीचे स्टाॅल मांडले आहेत. बहुतांश महिला रस्त्याच्या कडेला जमीनीवर विक्री करत आहेत.
रानमेव्याला चांगली मागणी
नैसर्गिक वातावरणातील ताज्या भाज्या, टवटवीत रसदार, जांभूळ, आंबा किफायतशीर दरात मिळत असल्याने पर्यटकांकडून आदिवासींच्या रानमेव्याला चांगली मागणी आहे. जांभूळ प्रति किलो दोनशे ते अडीचशे रुपये, तर आंबा दिडशे ते अडीचशे रुपये डझन भावाने विकला जात आहे.
निगडे मोसे येथील कातकरी वस्तीतील मंगल गोपीनाथ मोरे, शिल्पा नितीन जाधव,निलीमा बाळु कोळी, सुवर्णा अमोल जाधव, महादेव वाघमारे, बाळु वाघमारे, आदी तीस ते पस्तीस आदिवासी कातकरी बांधव जांभूळ, आंबा, रानमेव्याची विक्री करत आहेत. मंगल मोरे म्हणाल्या शनिवार, रविवारी सुट्टीच्या दिवशी मोठ्या संख्येने पर्यटक येत असल्याने या दिवशी मला दिड ते दोन हजार रुपये जांभूळ आंबा रानभाज्यांच्या विक्रीतून मिळत आहेत.
वरदाडे येथील गणेश पवार, दादु जाधव, आकाश पवार,राजेश कोळी, सुवर्णा पवार, शोभा जाधव आदी आदिवासी बांधव रानमेव्याची दररोज वरदाडे, मालखेड येथील रस्त्यावर विक्री करत आहेत. आकाश पवार म्हणाले, शेतकऱ्यांकडून जांभूळ आंबा विकत घेऊन त्याची आम्ही विक्री करत आहे, त्यामुळे आम्हाला यंदा चांगला रोजगार मिळत आहे.
हंगामी विक्री स्टाॅल उभारण्यात यावेत
पानशेत,ओसाडे, रुळे ,कुरण खुर्द आदी ठिकाणच्या आदीवासी कातकरी बांधवांनाही रानमेव्याच्या विक्रीतून चांगला रोजगार मिळत आहे. हवेली तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती किसनराव जोरी म्हणाले, आदीवासी कातकरी बांधवांनी रानमेव्याच्या विक्रीतून चांगला रोजगार मिळत आहे. त्यामुळे वरदाडे मालखेड, निगडे मोसे, ओसाडे, डोणजे आदी ठिकाणी रस्त्यावर आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून हंगामी विक्री स्टाॅल उभारण्यात यावेत, यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.





