Kathapur Bendur Miravnuk: कठापूरच्या बेंदूर सोहळ्यात अवतरले स्टार बैल; पश्चिम महाराष्ट्रात चर्चा
Kathapur Bendur Miravnuk: कल्याण, बदलापूर, ठाणे आणि कराडमधील नामवंत बैलांची हजेरी; रंगीबेरंगी झुली, घुंगरू आणि फुलांच्या सजावटीने उपस्थितांची जिंकली मने.

Kathapur Bendur Miravnuk – बैलगाडी शर्यतप्रेमी आणि बैलगाडी मालकांचे गाव म्हणून ओळख असलेल्या कोरेगाव तालुक्यातील कठापूर येथे बेंदूर सणानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य शाही मिरवणुकीने संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले. आकर्षकपणे सजवण्यात आलेले प्रसिद्ध बैल, पारंपरिक वाद्यांचा गजर, ढोल-ताशांचा दणदणाट, लेझीम पथके, घोडे,
उंट आणि डॉल्बीच्या निनादात निघालेल्या या दिमाखदार मिरवणुकीत सातारा जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील विविध भागांतून हजारो बैलगाडी शर्यतप्रेमींनी उपस्थिती लावत सोहळ्याची भव्यता अनुभवली. अतुलशेठ केंजळे यांच्या पुढाकारातून पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेली ही मिरवणूक रात्री उशिरापर्यंत उत्साहात पार पडली.
ग्रामीण संस्कृतीचा वारसा जपत पारंपरिक आणि आधुनिक आकर्षणांचा सुंदर संगम या सोहळ्यात अनुभवायला मिळाला. यंदाच्या शाही मिरवणुकीत कुमारी राही अतुल केंजळे यांचा प्रधान-2988. राहुल भैय्या पाटील (आडीवली, कल्याण, जि. ठाणे) यांचा मथुर-1001, उत्तम शेठ गवळी (बदलापूर) यांचा भारत-7007, नगरसेवक संतोष शेठ तोडकर (विठावा, ठाणे-मुंबई) यांचा सुंदर-1111, उदय पाटील (ओगलेवाडी,
कराड) यांचा गोट्या, वरद जिंजर कंपनी (विसापूर) यांचा कार्तिक-6060 या देखण्या बैलांनी उपस्थितांची विशेष दाद मिळवली. मिरवणुकीला प्रसिद्ध झेंडा पंच राजेंद्र धनावडे (बापू), समालोचक विकास जगदाळे (कुमठे) तसेच प्रताप झांजुर्णे (तडवळे, ता. कोरेगाव) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. रंगीबेरंगी झुली, फुलांचे हार, घुंगरू,
पारंपरिक अलंकार आणि आकर्षक सजावटीने नटविण्यात आलेल्या बैलांच्या रुबाबदार चालण्याने उपस्थितांची मने जिंकली. गावातील प्रमुख मार्गांवरून मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी ग्रामस्थांनी पुष्पवृष्टी करत मिरवणुकीचे स्वागत केले, तर बैलांची पूजा करून शेतीतील त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांनी मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभाग घेतला.





