PCMC News – पंतप्रधानांनी इंधन बचतीचे आवाहन केले त्याचे पडसाद पिंपरी चिंचवड महापालिकेतही दिसून आले. भाजपच्या नगरसेवकांनी पंतप्रधानांच्या आवाहनाचे समर्थन करत सायकलने प्रवास केला. तर विरोधकांनी महापालिका भवनापर्यंत थेट बैलगाडी आणत इंधन दरवाढ आणि बचतीच्या आवाहनाचा निषेध केला. सर्वसाधारण सभेच्या (जीबी) पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी (दि. १५) महापालिका परिसरात नाट्यमय घडामोडी घडल्या. इंधन दरवाढ, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचतीच्या आवाहनाचा निषेध तसेच ५२ कोटी रुपयांच्या कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचे चित्र पाहायला मिळाले. महापौर रवी लांडगे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत सायकलवरून महापालिकेत आगमन केले. पर्यावरणपूरक वाहतुकीचा संदेश देण्याचा प्रयत्न यामागे असल्याचे सांगण्यात आले. महापौर आणि आयुक्तांच्या सायकल रॅलीचीही परिसरात चर्चा रंगली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक राजू बनसोडे, नगरसेविका स्वाती काटे आणि प्रतिक्षा लांघी-अंघोळकर हे महापालिकेत थेट बैलगाडीवरून दाखल झाले. वाढत्या पेट्रोल-डिझेल दराविरोधात त्यांनी हे अनोखे आंदोलन करत भाजप सरकारवर जोरदार टीका केली. “इंधन दर इतके वाढले आहेत की आता सामान्य नागरिकांना वाहन वापरणे कठीण झाले असून बैलगाडीची वेळ आली आहे,” असा टोला आंदोलनकर्त्यांनी लगावला. बैलगाडीच्या आंदोलनामुळे महापालिका परिसरात काही काळ मोठी गर्दी झाली होती. एकाच दिवशी बैलगाडी आंदोलन, सायकलवरून आगमन आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे पिंपरी चिंचवड महापालिकेतील वातावरण तापल्याचे चित्र दिवसभर पाहायला मिळाले.