Pune District : विधानभवनाच्या पायरीवर कटके नतमस्तक

लोणीकंद : महाराष्ट्र विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाची सुरुवात झाली. शिरूर- हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली कटके यांनी मुंबई येथे विधिमंडळात प्रवेश करण्यापूर्वी विधिमंडळ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेत विधिमंडळाच्या पहिल्या पायरीवर नतमस्तक होत आपल्या पहिल्या विशेष अधिवेशनाची सुरुवात केली.
पुणे जिल्ह्यातील शिरूर- हवेलीची विधानसभा निवडणूक चुरशीची झाली होती. पुणे जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलेल्या ज्ञानेश्वर कटके यांनी विधानसभेच्या निवडणुकीत एकहाती विजय संपादन केला. शांत व संयमी स्वभावाचे, जनमाणसात कायम मिळून मिसळून वागणारे नम्र आमदार म्हणून कटके यांची ओळख आहे. महाराष्ट्रात सत्ता स्थापन झाल्यांनतर होत असलेल्या अधिवेशनाची कटके यांची पहिलीच वेळ आहे.
विधानभवनात पहिल्या पायरीवर डोके ठेवत नतमस्तक झाल्याने त्यांच्या नम्र स्वभावाची शिरूर हवेली मतदारसंघातील जनतेला पुन्हा एकदा प्रचिती आली. विधानसभेच्या प्रचारसभेदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूर हवेलीसाठी ५ हजार कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचे भरसभेत जाहीर केले होते. अजित पवार हे बोलतात तसं करतातच याची प्रचिती संपूर्ण महाराष्ट्राला आहे. त्यामुळे येत्या काळात आमदार कटके यांच्या रूपाने शिरूर हवेलीमध्ये विकासाची गंगा वाहणार असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दिली.
शिरूर- हवेली मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठीच ५ वर्षांच्या कामाची सुरुवात ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे दर्शन घेत विधिमंडळाच्या पहिल्या पायरीवर नतमस्तक होऊन केली आहे. सर्वसामान्य जनता हीच माझी ऊर्जा आहे. त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी निरंतर कार्यरत राहणार आहे.
– ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली कटके, आमदार, शिरूर- हवेली.





