Kasturba Hospital: रात्री मद्यपींचा सुळसुळाट, दिवसा अनधिकृत पार्किंग; कस्तुरबा रुग्णालयाची जागा धोक्यात
Kasturba Hospital: कस्तुरबा रुग्णालयाची इमारत पाडून ३ महिने उलटले तरी कुंपण नाही; पालिकेच्या दुर्लक्षामुळे मोक्याच्या जागेत हातगाड्या आणि वाहनांचे अनधिकृत पार्किंग.

Kasturba Hospital – सातारा नगरपालिकेच्या मालकीच्या कस्तुरबा रुग्णालयाची धोकादायक इमारत दि. ३ एप्रिल रोजी नगराध्यक्षांच्या विशेष अधिकारातून जमीनदोस्त करण्यात आली. त्यावेळी या जागेवर शहरासाठी वैशिष्ट्यपूर्ण विकास प्रकल्प उभारण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, तब्बल तीन महिने उलटूनही जागेच्या संरक्षणासाठी साधे कुंपणही उभारले गेले नसल्याने आता या जागेचे रूपांतर हातगाड्या, टेम्पो आणि चारचाकी वाहनांच्या अनधिकृत पार्किंगमध्ये झाले आहे.
तांदूळ आळी परिसरातील मंडईतील हातगाड्या, मालवाहू टेम्पो आणि इतर वाहने सर्रास या जागेत उभी राहत आहेत. पालिकेच्या मालकीच्या जागेवर असा खुलेआम वापर सुरु असताना प्रशासन मात्र पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. रात्रीच्या वेळी या परिसरात मद्यपी आणि विनाकारण फिरणाऱ्यांची वर्दळ वाढत असून जागेचा गैरवापर होण्याची भीती निर्माण झाली आहे.
भविष्यात येथे पुन्हा अतिक्रमण झाले, तर ते हटवण्यासाठी पालिकेलाच मोठी कसरत करावी लागणार आहे, असे मत स्थानिकनागरिक व्यक्त करीत आहेत. तांदूळ आळी हा परिसर आधीच अतिक्रमणांचा अड्डा बनल्याची टीका होत असताना हातगाड्या, रिक्षा आणि अनधिकृत पार्किंगमुळे वाहतूक कोंडीही वाढली आहे. बाजारासाठी येणारे नागरिक नगर वाचनालयाच्या पार्किंगसह आता कस्तुरबा रुग्णालयाची जागाही पार्किंगसाठी वापरत असल्याचे दिसून येत आहे.
पावसाळ्यामुळे पालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेला सध्या ब्रेक लागला असला, तरी स्वतःच्या मालकीच्या जागेचे संरक्षण करण्यासाठी पालिकेने तत्काळ फेन्सिंग किंवा पत्र्याचे कुंपण उभारणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे. दरम्यान, नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी जाहीर केलेल्या विकास प्रकल्पाचे नेमके काय झाले, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. बांधकाम विभागाला तातडीने सूचना देऊन या जागेबाबत ठोस धोरण जाहीर करावे, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.





