Dangerous Buildings: सावधान! सातारा शहरात ३८५ इमारती धोकादायक; ६ इमारतींना पालिकेची थेट नोटीस
Dangerous Buildings: पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाचा सर्वे; अति धोकादायक इमारतींना नोटिसा बजावत मालमत्ता धारकांना स्वतःहून कारवाई करण्याचे आदेश.

Dangerous Buildings – पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सातारा नगरपालिकेने शहरातील धोकादायक इमारतींचा आढावा घेतला असून शहरात तब्बल ३८५ इमारती धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापैकी अति धोकादायक असलेल्या सहा इमारतींच्या मालकांना नोटीसा बजावून त्या इमारती स्वतःहून पाडण्याच्या सूचना नगरपालिकेच्या नगर विकास विभागामार्फत देण्यात आल्या आहेत. यंदा मान्सूनच्या आगमनास विलंब झाला असला तरी लवकरच पावसाळा सुरू होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे दरवर्षीप्रमाणे धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नगरपालिकेने शहरातील अति तातडीच्या आणि धोकादायक इमारतींवर इशारा फलक लावून नागरिकांना सतर्क केले आहे. पालिकेच्या माहितीनुसार, शहरातील धोकादायक इमारतींपैकी सुमारे १० ते १५ टक्के इमारती रिकाम्या आहेत. मात्र, उर्वरित इमारतींमध्ये अंदाजे दोन हजार नागरिक वास्तव्यास असल्याने त्यांची सुरक्षितता हा गंभीर चिंतेचा विषय बनला आहे.
मुख्याधिकारी विनोद जळक यांनी सांगितले की, धोकादायक इमारतींबाबत पालिकेचे ठोस धोरण असून संबंधित मालमत्ता धारकांना इमारती पाडण्याबाबत वारंवार सूचना करण्यात येत आहेत. तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष सक्रिय करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात शहरातील ओढे आणि नाल्यांची साफसफाई पूर्ण करण्यात आली आहे.
दरम्यान, अनेक धोकादायक इमारती मालक व भाडेकरू यांच्यातील वादामुळे रखडल्या आहेत. जागा सोडल्यास हक्क गमावण्याची भीती असल्याने काही भाडेकरू जीव धोक्यात घालून अशा इमारतींमध्ये वास्तव्यास आहेत. या नागरिकांचे प्रबोधन करण्याचे काम पालिकेकडून सुरू असून कोणतीही जीवित किंवा वित्तहानी होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात असल्याचे मुख्याधिकारी जळक यांनी स्पष्ट केले. पावसाळ्यात संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी नागरिकांनी धोकादायक इमारतींपासून दूर राहवे तसेच पालिकेच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.





