Kasba Ganpati : मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची आरती संपन्न; मूर्तिकार अभिजीत धोंडफळे यांच्या हस्ते आरती
Kasba Ganpati : अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मानाचा पहिला आणि ग्रामदैवत श्री कसबा गणपतीच्या विसर्जन सोहळ्याला सुरुवात झाली आहे.

Kasba Ganpati : अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मानाचा पहिला आणि ग्रामदैवत श्री कसबा गणपतीच्या विसर्जन सोहळ्याला सुरुवात झाली आहे. बाप्पाला निरोप देण्यापूर्वी उत्सव मंडपात विधिवत पूजा आणि आरती करण्यात आली. मूर्तिकार अभिजीत धोंडफळे यांच्या हस्ते श्री कसबा गणपतीची आरती संपन्न झाली.
आरतीच्या वेळी गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत बाप्पाचे दर्शन घेतले. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. दहा दिवसांच्या गणेशोत्सवानंतर लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी पुणेकर मोठ्या उत्साहात सज्ज झाले आहेत.
मानाचा पहिला कसबा गणपती असल्याने पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीत कसबा गणपतीला विशेष मानाचे स्थान आहे. परंपरेनुसार कसबा गणपतीच्या मिरवणुकीनंतर इतर मानाचे गणपती आणि विविध गणेश मंडळांच्या मिरवणुका पुढे सरकतात.
आरतीनंतर आता काही वेळातच श्री कसबा गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ होणार आहे. यंदा बाप्पाची मिरवणूक पारंपरिक रजत पालखीतून काढण्यात येणार असून, विविध ढोल-ताशा पथके, दिंड्या आणि वाद्यपथकांचा सहभाग असणार आहे.
मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. विसर्जन सोहळा शांततेत पार पडावा यासाठी पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रमुख विसर्जन मार्गांवर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून, नागरिकांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, बाप्पाच्या शेवटच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची गर्दी होत आहे. पारंपरिक वाद्यांचा गजर, ढोल-ताशांचा निनाद आणि ‘मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात कसबा गणपतीची विसर्जन मिरवणूक काही वेळातच सुरू होणार असून, या सोहळ्याची पुणेकरांना उत्सुकता लागली आहे.





