‘कारवीची तऱ्हाच न्यारी, यंदा कासवर दर्शन हाय भारी’

पुणे – “कारवीची तऱ्हाच न्यारी, यंदा कासवर दर्शन हाय भारी’ अशा कारवीच्या निळ्या फुलांनी “कास पठार’ यंदा फुलणार आहे. “कास पठार’ ला महाराष्ट्राची “व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ समजले जाते. दरवर्षी सप्टेंबर महिन्यात हे खडकाळ असलेले 1750 हेक्टर पठार कोट्यवधी फुलांनी बहरून जाते. अनेक प्रकारची रंगीबेरंगी फुलांचे जणू गालिचेच या ठिकाणी पसरलेले असतात. यंदा मात्र स्पेशल “कारवी’चा हंगाम असून, तिची ही “निळी नवलाई’ पर्यटकांना खास आकर्षित करणार हे निश्चित आहे. हा हंगाम केवळ 15 दिवसांचाच असतो. ही सात-आठ वर्षांतून एकदा या ठिकाणी फुलतात. या आधी 2016 मध्ये ही फुले कास पठारावर फुलली होती, अशी माहिती उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांनी दिली.
या पठारावरची फुलांची उधळण ही दरवर्षीच असते त्यामुळे ती पाहण्याचा आनंद लुटण्यासाठी अनेक पर्यटक या ठिकाणी येतात. यंदाच्या हंगामातील फुले अजून उमलली नसल्याची माहिती सातारा वनविभागाचे परिक्षेत्र वनाधिकारी निवृत्ती चव्हाण यांनी दिली.
कारवीची फुले चार प्रकारची असतात. इथे कास किंवा महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात आपल्याला प्रामुख्याने टोपली कारवी आढळते. याचे शास्त्रीय नाव “स्ट्रोबिलॅन्थेस कॅलोसस’ असे आहे. कारवी हे परदेशी फूल असले तरी दुर्मिळ आहे. शिवाय हे उपद्रवी नाही. यामुळे जमिनीची धूप नियंत्रित होते, तसेच पाणी जमिनीमध्ये मुरण्यासाठी या झाडांचा उपयोग होतो. यातून भूजल पातळी वाढण्याला मदत होते, अशी माहिती सातारा वनविभागांतर्गत कास पठाराचे माजी रेंजर श्रीरंग शिंदे यांनी दिली.
“कारवी’ हे श्रीलंकेचे राष्ट्रीय फूल आहे. परंतु भारतात ते महाराष्ट्राशिवाय कर्नाटक, केरळ या ठिकाणीही आढळते. परंतु या दोन राज्यातील त्यांचा हंगाम हा दर 10-12 वर्षांनी असतो. या उलट क्षार आणि उष्ण, दमट हवामान, समुद्रसपाटीपासूनची उंची यामुळे महाराष्ट्रात हा हंगाम दर सात-आठ वर्षांनी अनुभवायला मिळतो. 2011 मध्ये कारवीची फुले कास पठारावर केवळ 10 टक्केच उमलली होती. परंतु यंदा ती 40 टक्क्यांपेक्षा जास्त फुलली आहेत, अशी माहिती शिंदे यांनी दिली.
‘कारवी’चे औषधी गुणधर्म
हे फूल सुंदर आहेच परंतु त्याचे औषधी गुणधर्मही आहेत शिवाय मनुष्य आणि अन्य प्राण्यांनाही तिचा उपयोग आहे. हे एक रानफुल आहे जे मानव आणि वन्यजीव दोघांनाही आधार देते आणि मोठ्या शाकाहारी प्राण्यांसाठी, गुरेढोरे आणि लहान कीटकांसाठी अन्नाचा स्रोत म्हणून कार्य करते. हे त्याच्या परागकणांना, प्रामुख्याने मधमाशांना अमृत आणि परागकण दोन्ही मोठ्या प्रमाणात पुरवते. या फुलांच्या मधातून मधमाश्या दुर्मिळ कारवी मध तयार करतात. ज्यात रंग, चव आणि सुगंध यांचे अद्वितीय मिश्रण आहे. या फुलांचे मध मानवांसाठी फायदेशीर आहे कारण ते पाठीच्या कण्याला ताकद देते.





