हिंगोली: ताडासारखी तूर वाढली पण ना फुले ना शेंगा..; दहा एकरातील तुरीवर शेतकऱ्यांनी फिरवला रोटावेतर

– शिवशंकर निरगुडे (प्रतिनिधी)
हिंगोली : हिंगोली नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट होत आहे, तर दुसरीकडे बाजारपेठेतही कवडीमोल दरात शेतमाल विक्री करावा लागत असल्याने शेतकऱ्यांना लागवड खर्चही वसूल होत नसल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील साखरा येथील शेतकरी अतुल राऊत यांच्या शेतात तुरीचे पीक ताडाच्या झाडांसारखे वाढले.
परंतु, त्यांना फुलेही लागली नाहीत अन् शेंगांचाही पत्ता नाही. परिणामी, शेतकरी अतुल राऊत संकटात सापडले आहेत. साखरा येथील शेतकरी अतुल राऊत यांनी साधारणतः जुलैमध्ये वीस एकर शेतात सोयाबीन आणि तुरीची पेरणी केली. परंतु,पावसाचा लहरीपणा, येलोमोझॅकचा हल्ला यामुळे सोयाबीनचे उत्पादननिम्म्याखाली आले.
त्यातच बाजारात ४ हजार ४०० वर सोयाबीनला भाव जात मिळत नसल्याने लागवडखर्चही वसूल झाला नाही. सोयाबीन हातचे गेले. किमान तुरीचे उत्पादन चांगले होईल म्हणून प्रारंभापासूनच खत, वेळेवर फवारण्या केल्या. तुरीच्या पिकाची वाढही चांगली झाली. परंतु,या तुरीला ना फुले आली, ना शेंगा लागल्या.
इतर शेतकऱ्यांच्या शेतातील तुरीचे पिक कापणीलाआले आहे परंतु अतुल राऊत यांच्या दहा एकरातील तुरीवर राऊत यांनी रौटावैटर फिरवला आहे राऊत यांच्या शेतातील तूर हिरवीगार असून नुसती सात फुटाच्या वर वाढली आहे या पिकाला आता शेंगा आणि फुले देखील लागले नाहीत त्यामुळे राऊत यांना मोठा फटका बसला आहे
दहा एकरातील चार लाखांचे उत्पन्न बुडाले….
सोयाबीन हातचे गेल्याने किमान तूर पिकातून चांगले उत्पन्न मिळेल, या आशेने वेळेवर खत टाकले. फवारण्याही केल्या. परंतु, तूर नुसतीच वाढली. दहा एकरांत किमान 30 क्विटल तुरीचे उत्पादन अपेक्षित होते. परंतु, शेंगाच लागल्या नसल्याने उत्पादन बुडाले आहे. परिणामी, शेतकरी राऊत यांना जवळपास चार लाख रुपयांचा फटका बसला आहे.
आमच्या परिसरातील माझ्या सह काही शेतकऱ्यांच्या शेतातील तुरीला शेंगा लागल्या नाहीत महागड्या फवारन्या करून देखील काही फायदा झाला नाही व तसेंच बुरशीजण्य रोगाने तुरीचे पिक वाळून देखील गेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठें नुकसान झाले आहे. प्रशासनाच्या वतीने तत्काळ पिक विमा देण्यात यावा व सरकारकडुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी.
– अतुल राऊत (रा. साखरा ता .सेनगाव जि. हिंगोली)





