Pune : चायनामेड प्लॅस्टिक फुले सजावटीसाठी नकोच

पुणे – चायनामेड प्लॅस्टिकची फुले सजावटीसाठी नकोच, यामुळे फूल उत्पादक शेतकऱ्यांवर परिणाम होत असून, त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे यांच्या आयातीवरच बंदी घाला, अशी मागणी केली जात आहे. मात्र, गणेशोत्सवाच्या तोंडावर यावर्षीतरी याबाबत आदेश निघण्याची शक्यता अगदीच नगण्य असून, या फुलांच्या कारवाईचेही प्लॅस्टिक पिशव्यांप्रमाणेच होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
भारतात चीनमधून प्लॅस्टिकच्या फुलांची आयात होते. अनेक व्यापारी त्यामुळे स्थानिक फूल उत्पादक शेतकऱ्यांवर परिणाम होतो, कारण त्यांच्या फुलांची मागणी कमी होते. याशिवाय पर्यावरणावरही गंभीर परिणाम होतो. याबाबत तीन दिवसांपूर्वी विधानसभेतही काही मंत्र्यांनी आवाज उठवत या फुलांच्या आयातीवर बंदी आणण्याची मागणी केली. यापूर्वीही माजी खासदार राजू शेट्टी यांनी वारंवार हा मुद्दा उपस्थित केला आहे.
मात्र, गणेशोत्सव जेमतेम सव्वा महिन्यांवर आला आहे. याच काळात गौरींचेही आगमन होते. गणेशोत्सवाची तयारीही सुरू झाली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी या कृत्रिम फुलांचा मोठ्या प्रमाणावर स्टॉक केला आहे. बाजारात ही फुले विक्रीसाठीही उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे आता यांवर कारवाई होणार का, असा प्रश्न यानिमिताने उपस्थित झाला आहे. मुख्यमंत्री बैठक घेणार आणि त्यानंतर त्याचा आदेश निघणार, तोपर्यंत सण उरकून आणि फुलांचा व्यवसाय होऊनही गेला असेल, अशीही शंका यानिमिताने उपस्थित होत आहे.
काय आहे ही मागणी
राज्यात सण- उत्सवांच्या काळात मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक फुलांचा वापर होत असून, यामुळे नैसर्गिक फूलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने प्लॅस्टिक फुलांवर बंदी घालावी, अशी मागणी विधानसभेत तासगाव- कवठे महांकाळचे आमदार रोहित पाटील यांनी केली. त्याला १०५ आमदारांनी पाठिंबा दिला आहे. त्याला मुख्यमंत्र्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला असून, यासंदर्भात फलोत्पादन मंत्री भरत गोगावले आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत तातडीने बैठक घेण्याचे आश्वासन दिले.
चायनामेड फुलांना मागणी का?
चीनमधून आयात केल्यामुळे ही फुले स्वस्त दरात उपलब्ध होतात, तसेच ती पुन्हा पुन्हा वापरता येतात. खऱ्या फुलांच्या तुलनेत अतिशय स्वस्त असतात. याशिवाय अनेक रंगबिरंगी प्रकारात, अतिशय आकर्षक स्वरूपात मिळतात. त्यामुळे ती घेतली जातात.
पॉली हाउसला येणारा खर्च आणि फुलांच्या किमती
खऱ्या फुलांच्या शेतीमध्ये झेंडू, शेवंती अशा फुलांची शेती सोडली, तर जरबेरा वगैरेंसारख्या महागड्या फुलांची शेती पॉली हाउसमध्ये केली जाते. ही फुले खूप नाजूक असतात. यांना किडीपासून संरक्षण देण्यासाठी आणि योग्य हवामानात तिचे जास्तीतजास्त उत्पादन घेता यावे, यासाठी मोठा खर्च केला जातो. त्यामुळे साहजिकच ही फुले महाग असतात. त्याच्या तुलनेत प्लॅस्टिकची फुले अतिशय स्वस्त असतात. शिवाय ती खऱ्या फुलांसारखी दिसतात.
पावसावर अवलंबून फूलशेती
झेंडू, शेवंती ही सर्वाधिक वापरली जाणारी फुले ही पावसावर अवलंबून असतात. गणेशोत्सव काळात पाऊस जास्त आला, तर ही फुले कुजतात. त्यामुळे त्यांना भाव येत नाही. हारांमध्ये, सजावटींच्या माळांमध्ये ही फुले जास्त वापरली जातात. त्यामुळे ऐनवेळीच याचे भाव समजतात. अशा वेळी खोट्या फुलांना पसंती दिली जाते.
‘प्लॅस्टिकच्या फुलांवर कारवाईबाबत पुणे महापालिकाही सकारात्मक आहे. विधानसभेत यावर चर्चा झाली असली, तरी अद्याप निर्णय झालेला नाही. याचा अध्यादेशही महापालिकेकडे आला नाही. त्यामुळे कारवाई करण्याला मर्यादा आहेत. कारवाई करण्यासाठी गेल्यावर व्यापाऱ्यांकडून आदेश कोठे आहे, असे विचारले जाते. त्यामुळे महापालिका राज्य सरकारच्या आदेशाची वाट पाहात आहे.’ – संदीप कदम, उपायुक्त, पुणे महापालिका





