Karnataka Guarantees : कर्नाटक सरकारच्या आणखी दोन गॅरंटी झाल्या लागू…

बेंंगळुरू :- कर्नाटकातील कॉंग्रेस सरकारच्या दहा किलो मोफत तांदुळाची अन्नभाग्य योजना आणि मोफत वीजेची योजना या आणखी दोन “गॅरंटी” योजना आजपासून लागू करण्यात आल्या आहेत. कॉंग्रेस सरकारने निवडणुकीच्या काळात मतदारांना ज्या पाच गॅरंटी दिल्या होत्या त्यातील महिलांच्या मोफत बस प्रवासाची योजना आधीपासूनच सुरू झाली आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज ही माहिती दिली. ते म्हणाले की, या महिन्यासाठी अन्न भाग्य योजनेंतर्गत लाभार्थ्यांना पाच किलो तांदुळ मोफत दिला जात असून उर्वरीत पाच किलो तांदळाचे रोख पैसे त्यांच्या खात्यात जमा केले जातील. हे पैसे 10 जुलै पासून वितरीत केले जाणार आहेत.
मोफत वीजेची गृह ज्योती योजना आजपासून लागू झाली असून या महिन्याचे वीज बिल बिलिंग सायकलनुसार ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला येईल.त्यात प्रत्येक घराला दोनशे युनिट वीज मोफत दिली जाणार आहे.
ते म्हणाले की, अन्न भाग्य योजने अंतर्गत आम्ही दारिद्रय रेषखालील परिवाराला दहा किलो तांदुळ मोफत देण्याची घोषणा केली होती. पण त्यासाठी तांदुळ पुरवण्यात केंद्र सरकारने आडकाठी आणल्याने आम्ही पाच किलो तांदुळ आणि पाच किलो तांदळाचे रोख पैसे देण्याचे ठरवले आहे. 34 रूपये प्रतिकिलो प्रमाणे पाच किलो तांदुळाचे पैसे लोकांच्या खात्यात थेट वर्ग केले जाणार आहेत.
अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री के एच मुनियप्पा म्हणाले, एक आठवडा किंवा 10 दिवसात लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात रक्कम हस्तांतरित केली जाईल.लाभार्थिंना पाच किलो तांदळाचे 170 रूपये मिळतील.
दरम्यान, ‘गृह ज्योती’ संदर्भात चिक्कमगलुरू येथे पत्रकारांशी बोलताना ऊर्जा मंत्री के जे जॉर्ज म्हणाले की, योजनेसाठी नोंदणी सुरू आहे आणि सुमारे 86.5 लाख ग्राहकांनी नोंदणी केली आहे.गृह भाग्य योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना ऑनलाइन नोंदणी करावी लागेल, असे मंत्री म्हणाले. या महिन्यात लाभ घेण्यासाठी 24 किंवा 25 जुलैपर्यंत अर्ज करता येईल.





