Bengaluru Stampede : ‘लोक कोहलीला कधीही विसरणार नाहीत…’, माजी खेळाडू संतापला, १०० कोटींचा खटला दाखल करण्याची मागणी

Bengaluru Stampede Madan Lal suggests Victim families to sue 100 crore : बंगळुरूमध्ये उत्सवाला जो दिवस ऐतिहासिक ठरायला हवा होता, तो एक अकल्पनीय शोकांतिकेत बदलला. आरसीबीच्या पहिल्या आयपीएल विजयाच्या उत्सवात झालेल्या चेंगराचेंगरीत ११ चाहत्यांचा मृत्यू झाला, तर सुमारे ३३ जण जखमी झाले. दरम्यान, भारताचे माजी क्रिकेटपटू आणि १९८३ च्या विश्वचषक विजेते मदन लाल यांनी आयोजकांवर टीका केली आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबांनी आरसीबी आणि राज्य सरकारवर १०० कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईसाठी दावा करावा, अशी मागणी केली आहे.
मदन लाल यांनी दिली अतिशय तीव्र प्रतिक्रिया –
माजी भारतीय क्रिकेटपटू मदन लाल म्हणाले की, “लोक ही घटना आणि विराट कोहलीला कधीही विसरणार नाहीत. जेव्हा बाहेर लोक मरत होते, तेव्हा आत आनंदोत्सव सुरू होता. हे खरोखरच धक्कादायक आणि निराशाजनक आहे. या दुःखद अपघातासाठी मृतांच्या कुटुंबियांनी आरसीबी आणि राज्य सरकारवर १०० कोटी रुपयांचा दावा दाखल करावा.”
बीसीसीआयला दोष देणे चुकीचे – आयपीएलचे अध्यक्ष
यासोबतच, त्यांनी बीसीसीआयवर जबाबदारी टाळण्याचा आरोपही केला. आयपीएलचे अध्यक्ष अरुण धूमल यांनी या घटनेसाठी आयोजकांना जबाबदार धरले असून, बीसीसीआयला दोष देणे चुकीचे आहे, असे म्हटले आहे. अंदाजानुसार, २ ते ३ लाख लोकांच्या जमावाने सुरक्षा व्यवस्था मोडली. स्टेडियमच्या गेट क्रमांक ३ वर वाढत्या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. त्यानंतर चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला आणि सुमारे ३३ जण जखमी झाले.
हेही वाचा – Bengaluru Stampede : चेंगराचेंगरीनंतर आरसीबीसह केएससीए आणि डीएनएयवर गुन्हा दाखल!
मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकार आणि आरसीबीकडून मदत जाहीर –
या अपघातात आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकार आणि आरसीबीने भरपाई जाहीर केली आहे. कर्नाटक सरकारने सर्व ११ कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. आरसीबीने मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपये देण्याची घोषणाही केली आहे. याशिवाय, फ्रँचायझीने ‘आरसीबी केअर्स’ नावाचा एक निधी तयार करण्याची घोषणा केली आहे, ज्याद्वारे जखमींना मदत केली जाईल.





