बेंगळूरु हिंसाचारप्रकरणी कर्नाटक उपमुख्यमंत्र्यांचे काँग्रेसवर गंभीर आरोप

बेंगळूरु – डीजे हाली भागातल्या हिंसाचाराला भडकावण्यात कॉंग्रेसचा हात आहे, हे उघड गुपित आहे, असा आरोप कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावडी यांनी केला आहे. सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणारी व्यक्ती कॉंग्रेसशी संबंधित आहे. सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया ही अल्पसंख्यांकांची संघटना हे घडवते आहे आणि त्यामध्ये कॉंग्रेसही गुंतलेली आहे, हे उघड आहे, असे सावडी म्हणाले.
डी.के. शिवकुमार, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे आपले नेते असल्याचे पोस्ट करणाऱ्या व्यक्तींनी मान्य केले आहे. या संदर्भात पोलीस तपास सुरू आहे. त्या लोकांनी जे काही केले आहे, ते लवकरच उघड होईल. या प्रकरणाला कॉंग्रेसचा थेट सहभाग आहे, असेही सावडी म्हणाले.
बेंगळूरुमध्ये झालेल्या हिंसाचाराची चौकशी सीबीआयकडून करण्यात यावी, अशी मागणी कॉंग्रेसचे आमदार अखंड श्रीनिवास मूर्ती यांनी केली आहे.
11 ऑगस्टला झालेल्या हिंसाचारात मूर्ती यांच्या घराची नासधूस झाली होती. बेंगळूरुमधील हिंसाचार प्रकरणी 16 ऑगस्ट रोजी 35 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणी आतापर्यंत अटक केलेल्यांची संख्या 340 इतकी झाली आहे.
हिंसाचार झाल्यानंतर मूर्ती यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे डीजे हाल्ली पोलीस स्थानकामध्ये “एफआआर’ दाखल करण्यात आली होती.





